"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं, पण..."; शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 01:03 PM2023-04-07T13:03:46+5:302023-04-07T13:04:52+5:30
महाराष्ट्राचे रामराज्य करायचे असेल तर अयोध्येतील श्रीराम मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतलेच पाहिजेत असं केसरकर म्हणाले.
मुंबई - आता यापुढे जे काही करायचे ते उद्धव ठाकरेंनाच करायचे आहे. आम्ही आमचा प्रयत्न केला. स्वत: मोदींनी सांगूनही ते आलेले नाहीत. मोदींना दिलेले वचनही त्यांनी मोडले. मी त्याचा साक्षीदार आहे. मोठ्या भावाने लहान भावाला माफ करावे लागते. परंतु ज्याप्रकारे अपमान झालाय ते पाहता जुळवून घेणे उद्धव ठाकरेंच्या हातात आहे असं विधान शिवसेना नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आम्हाला जे काही प्रयत्न करायचे होते ते आम्ही केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायचे हे उद्धव ठाकरेंनीच ठरवले होते. पण शरद पवारांनी माझ्यावर दबाव आणला आणि मला मुख्यमंत्री व्हायला लागले असं ठाकरेंचे म्हणणं होते. नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असले असते. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातीलच मुख्यमंत्री राज्यात आहेत. त्यामुळे त्यांना फारसं वाईट वाटू नये असं मला वाटते.
तसेच राज्यात काम करताना श्रीरामाचे आशीर्वाद मिळाले पाहिजेत. राज्य किती चांगले असावे तर त्याला रामराज्य म्हटलं जाते. महाराष्ट्राचे रामराज्य करायचे असेल तर अयोध्येतील श्रीराम मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतलेच पाहिजेत. आम्ही उत्तर प्रदेश भवन मुंबईत बांधले तसे रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी जे मराठी बांधव तिथे जातील त्यांच्यासाठी अयोध्येत मराठी भवन असावं. त्यासाठी दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट होणार आहे. त्यातून सकारात्मक घडेल असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा
धनुष्यबाण आणि शिवसेना नावाबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह समर्थक आमदार अयोध्येला जाणार होते असं सांगण्यात आले. हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटातील आमदार आणि समर्थक आमदार ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, सर्व कार्यक्रम ठरल्याचे सांगितले जात आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये हा धनुष्य जनतेपर्यंत फिरवला जाईल, अशी योजना शिंदेंच्या शिवसेनेने आखली आहे.