"उद्धव ठाकरे आणि CM फडणवीसांची छुपी रणनीती, लवकरच..."; भाजपच्या मित्रपक्षाचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:53 IST2025-01-27T13:46:25+5:302025-01-27T13:53:08+5:30
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व स्विकारलं असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

"उद्धव ठाकरे आणि CM फडणवीसांची छुपी रणनीती, लवकरच..."; भाजपच्या मित्रपक्षाचा मोठा दावा
Ravi Rana on Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. विधानसभेला ठाकरे गटाला केवळ २० जागा मिळवता आल्या. यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे उद्धव ठाकरे हे भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा राजकारणात सुरु झाली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छुपी रणनीती आहे असा दावा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व स्वीकारलं आहे आणि आता ते पंतप्रधान मोदींचेही नेतृत्व स्वीकारतील असंही रवी राणा म्हणाले.
विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे गटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यावरुनच ठाकरे भाजपच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला जातोय. आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतली होती. यावरुनच जोरदार चर्चा सुरु झाली. अशाताच आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे. तसेच संजय राऊतांना मोठा झटका बसणार असल्याचेही रवी राणा यांनी म्हटलं आहे.
"संजय राऊतांना कल्पना नाही. ते अजूनही अंधारात आहेत. उद्धव ठाकरेंची मोठ्या प्रमाणात छुपी रणनीती देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनी स्विकारलेलं आहे. येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदी यांचेही नेतृत्व ते स्विकारणार आहेत. त्या दृष्टीने त्यांचे पाऊल टाकणं सुरु आहे. म्हणून संजय राऊतांना असा झटका बसेल की उद्धव ठाकरेसुद्धा भाजपसोबत दिसतील," असा दावा रवी राणा यांनी केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने युवा स्वाभीमान पक्षाचे आमदार रवी राणा नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर रवी राणा यांनी मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांसमोर खंत व्यक्त केली. आमदार बनून बनून मी त्रासलो आहे, मला देखील वाटतं मी मंत्री झाले पाहिजे, अशी भावना रवी राणा यांनी व्यक्त केली होती.