शिवसेना आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले; 18 सप्टेंबरला बोलावली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 10:32 AM2017-09-11T10:32:56+5:302017-09-11T10:34:36+5:30
शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद टाळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता सरसावले आहेत.
मुंबई, दि. 11- शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद टाळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता सरसावले आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार पक्षात नाराज असल्याची चर्चा लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी आमदारांची नाराजी जाणून घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचं समजतं आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांची 18 सप्टेंबरला बैठक बोलावली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे. पक्षामध्ये काही आमदार नाराज असल्याने भविष्यात आमदारांची फाटाफूट होऊ शकते, तसं होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे पावलं उचलत असल्याचं समजतं आहे.
शनिवारी चेंबूर अणुशक्ती नगर येथील शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. शिवसेना आज राज्यात, केंद्रात आणि महापालिकेत सत्तेमध्ये आहे. पण सत्तेत राहूनही कामं होत नसतील तर, निश्चितच दु:ख होतं, अशा शब्दात तुकाराम काते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
शिवसेनेच्या मंत्र्यांकडून कामं होत नाहीत. मी आज शिवसेनेमध्ये नाराज आहे, अशी स्पष्ट कबुलीच त्यांनी दिली. मी पक्षावर नाराज असलो तरी, शिवसेना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. मी भाजपामध्ये जाणार असल्याच्या वावडया उठवल्या जात आहेत. पण मी शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही.
नारायण राणेंनी मला संपवण्याची धमकी दिली तेव्हाही मी शिवसेना सोडली नव्हती. सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कठिण काळात मला मदत केली. त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची ऑफर दिली होती. पद देण्याचा शब्द दिला होता पण त्यावेळी सुद्धा मी शिवसेना सोडली नाही असं तुकाराम काते यांनी सांगितलं.