'विवेकभ्रष्ट, नितीभ्रष्ट झाल्याने ठाकरेंना सडकछाप शब्दांचा वापर करावा लागतोय', बावनकुळेंचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 06:52 PM2023-08-27T18:52:45+5:302023-08-27T18:53:20+5:30
देवेंद्र फडणवीस तुमच्यासारखं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जपानला गेले नव्हते.
मुंबई- शिवसेना(उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंगोलीत जाहिर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरुन त्यांच्यावरही सडकून टीका केली. या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
बावनकुळे यांनी ट्विटरद्वारे उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. 'जे उद्धव ठाकरे सत्तेत असताना अडीच वर्षे घरात बसून होते, ज्यांनी कोरोना काळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं, गेल्या महिन्यात जे १५ दिवस परदेश दौऱ्यावर जाऊन सुट्टी एन्जॉय करून आले, ते देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावर टीका करत आहेत. देवेंद्रजींचा जपान दौरा तुमच्यासारखा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी नव्हता तर राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी होता,' अशी टीका बावनकुळे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, 'उद्धव जी एक लक्षात घ्या, तुम्ही आता विवेकभ्रष्ट, नितीभ्रष्ट झाला आहात. म्हणूनच देवेंद्रजी यांच्यावर टीका करताना तुम्हाला सडकछाप शब्दांचा वापर करावा लागत आहे. तुमचे हे नैतिक अधःपतन महाराष्ट्र बघत आहे. नरेंद्र मोदीजींच्या कर्तृत्वामुळे तुमच्या घमेंडियाला घरघर लागली आहे. त्यामुळे तुम्ही हर घर मोदी अभियानावर टीका करत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. मोदीजी आणि देवेंद्रजींवर असलेल्या जनतेच्या प्रेमामुळेच तुमच्या अहंकाराचा येत्या निवडणुकीत पराभव होईल,' असंही ते म्हणाले.