"व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला"; इम्तियाज जलील यांचे ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 07:37 PM2022-06-22T19:37:38+5:302022-06-22T19:38:19+5:30

'एमआयएम'च्या इम्तियाज जलील यांनी केलं मुख्यमंत्र्यांचे कौतुक

Uddhav Thackeray Honesty praised by Aimim Leader Imtiaz Jaleel amid Eknath Shinde Shivsena Revolt | "व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला"; इम्तियाज जलील यांचे ट्वीट

"व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला"; इम्तियाज जलील यांचे ट्वीट

googlenewsNext

CM Uddhav Thackeray Imtiaz Jaleel: शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व बंडखोर आमदार गुवाहटीच्या हॉटेलमध्ये आहेत. शिवसेना आणि बंडखोर आमदार यांच्यात एकमेकांवर आरोपाचे सत्र सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र बंडखोरांना भावनिक साद घातली. आपल्याकडे ४६ आमदारांचे समर्थन असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर, शिवसेनेत भूकंप आला. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत भेटून चर्चा करण्याचे आवाहन केले. तसेच, शिवसैनिक आमदारांना हवं असेल तर मी राजीनामा द्यायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले.

शिवसेनेतील बंडखोर नेत्यांसह एकनाथ शिंदेंनी परत यावे आणि माझ्याशी थेट चर्चा करावी. त्यांना हवं असेल तर मी राजीनामा देईन. दुसरा कोणताही शिवसैनिक मुख्यमंत्री झाला तर मला आनंदच आहे, अशी भावनिक साद उद्धव यांनी शिंदे समर्थक आमदारांना घातली. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी यावर ट्वीट केले. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणा मला खूपच भावला. आमचे शिवसेनेशी राजकीय किंवा वैचारिक मतभेद आहेत. पण मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण ऐकून मला त्यांचे कौतुक करावेसे वाटते. व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला. तुमच्या पक्षातील सर्व बंडखोरांना तुम्ही तुमच्या नम्रपणे चपराक लगावली आहेत", असे ट्वीट इम्तियाज जलील यांनी केले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत सरकार स्थापन करावे, असा प्रस्तावही दिला होता. कालपासून आजपर्यंत राज्यात झालेल्या संपूर्ण राजकीय घडामोडींसंदर्भात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट ऑनलाईन पद्धतीने राज्यातील जनतेशी संवाद साधला. "कमलनाथ आणि शरद पवार यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण माझीच लोकं म्हणत असतील तर आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री नकोत, तर मग काय म्हणायचे? बंडखोर आमदारांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, सुरतला जाऊन काय बोलायची गरज होती? इथे बोलायचे. समोरा समोर बोलायचे. मी आजही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. मी आज माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हालवतो. मला कोणताही मोह नाही", असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray Honesty praised by Aimim Leader Imtiaz Jaleel amid Eknath Shinde Shivsena Revolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.