उद्धव ठाकरे आणि मी ११ तारखेला मुंब्र्याला चाललोय, दाखवा मस्ती; राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 11:54 AM2023-11-09T11:54:44+5:302023-11-09T12:21:37+5:30
24 डिसेंबर नंतर या महाराष्ट्रात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. - संजय राऊत.
इलेक्शन कमिशन हे इडी आणि सीबीआय प्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या पिंजऱ्यातला पोपट आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने निर्णय घेतला हा पूर्णपणे सरकारच्या अत्यंत दबावाखाली घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वीस-पंचवीस आमदार इकडे तिकडे गेले म्हणून संपूर्ण शिवसेना एका फुटीर गटाच्या हातात ठेवली. त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनची नियत आणि बिघडलेले चारित्र्य दिसते अशा कमिशनकडे जाऊन काय न्याय मिळणार आहे. शरद पवार ज्या पक्षाचे संस्थापक आणि त्यांचा पक्ष अजित पवार यांना दिला जातो, असे इलेक्शन कमिशन आपल्याला लाभले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
या महाराष्ट्रामध्ये कमजोर व अस्थिर सरकार बसले आहे. मुख्यमंत्र्यांना कोणी जुमानत नाही भाजपवाले त्यांना जुमानत नाहीत. कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे, ही परिस्थिती याआधी निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाही तर मंत्र्यांमध्ये प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर ही डेडलाईन दिली आहे. 24 डिसेंबर नंतर या महाराष्ट्रात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. जरांगे पाटील यांनी मुंबईचे नाक बंद करण्याचा इशारा दिला आहे. जर मुख्यमंत्र्यांनी एक गांभीर्याने घेतलं नाही तर या देशात महाराष्ट्राची बेअब्रू होईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.
छगन भुजबळ मंत्री आहेत, ते ओबीसी समाजाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडे जर माहिती असेल त्यांनी ती पोलिसांना द्यावी, मुख्यमंत्र्यांकडे द्यावी समोर ठेवावी हवेत गोळीबार करून काय उपयोग, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
मुंब्र्यामध्येही मुख्यमंत्री आणि त्यांच्या लोकांची माफियागिरी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात निर्माण केलेल्या शाखा या तुम्ही ताब्यात घेत आहात आणि बुलडोजर फिरवत आहात, ही मस्ती फार काळ राहणार नाही. उद्धव ठाकरे आणि आम्ही 11 तारखेला चाललो आहोत, पाहुना काय होते, कोणाला दाखवता मस्ती. पोलिसांना मी काल इशारा दिला आहे. तेव्हा होते का एकनाथ शिंदे शाखा बांधायला आणि आता ताबा घ्यायला जात आहात. त्या शाखेत बाळासाहेबांचा फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि त्या शाखेवर तुम्ही फिरवत आहात ही मुघलाई सुरू आहे का? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.