Uddhav Thackeray: 'मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाहीये; माझा जीव तुमच्यासाठी तळमळतोय'- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 08:39 PM2023-03-26T20:39:38+5:302023-03-26T20:47:30+5:30

'सत्ता गेल्याचे दुःख नाही; गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही.'

Uddhav Thackeray: 'I am not contesting to become Chief Minister again, if...' Uddhav Thackeray's public appeal to the people | Uddhav Thackeray: 'मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाहीये; माझा जीव तुमच्यासाठी तळमळतोय'- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: 'मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाहीये; माझा जीव तुमच्यासाठी तळमळतोय'- उद्धव ठाकरे

googlenewsNext

मालेगाव-  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकच्या मालेगावमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'आज आपलं नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलं, माझ्या हातात काहीही नाही, तरीदेखील एवढी गर्दी आली आहे. ही सगळी पूर्वजांची पुण्याई आणि आई जगदंबेचा आशिर्वाद,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'तुम्ही जे प्रेम मला देत आहात, ते गद्दारांच्या नशिबी नाही. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाहीये, मी तुमच्या प्रश्नासाठी लढतोय. आता जिंकेपर्यंत लढायचं आहे. मी इथे आल्यानंतर शेतकऱ्यांना भेटलो, काय परिस्थिती आलीये शेतकऱ्यांवर. ज्यावेळेस आमचे सरकार होते, तेव्हा शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळायच्या. मी मुख्यमंत्री झालो आणि शेतकऱ्यांसाठी पहिला निर्णय घेतला. त्यानंतर अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले, पण नंतर सत्तांतर झाले. आता शेतकऱ्यांच्या हाती काही येत नाही.' 

संबंधित बातमी- तुम्ही कपाळावर गद्दार म्हणून शिक्का मारुन घेतला; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

'आजचे मुख्यमंत्री स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणतात. ते हेलिकॉप्टरने शेतात जातात. मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमतात, पण त्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही. कृषीमंत्री तर कधी दिसत नाहीत. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, किती फटका बसला, हे काळोखात जाऊन बघतात. हे कृषीमंत्री महिलांना शिव्या देतात. सुप्रिया सुळेंना शिवी दिली आणि हे अजूनही पदावर बसले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात ज्या तत्परतेने शेतकऱ्यांना मदत मिळायची, तेवढी आता मिळत नाही. माझा जीव तुमच्यासाठी तळमळतोय. सत्ता गेल्याचे दुःख नाही, पण चांगले काम करणारे सरकार तुम्ही पाडले. खंडोजी खोपडेची औलाद, गद्दाराच्या हातात भगवा शोभत नाही,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

राहुल गांधींना सल्ला
यावेळी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांनाही सावरकरांच्या मुद्द्यावरुन सल्ला दिला. 'वीर सावरकर आमचे दैवत आहेत, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. भाजपविरोधात सोबत लढायचे असेल तर दैवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. चाफेकर बंधुंना फाशी दिल्यानंतर अवघ्या 15 वर्षांच्या सावरकरणांनी इंग्रजांना मारण्याची शपध घेतली होती. सावरकरांनी 14 वर्षे काय मरण यातना सहन केल्या, त्याचा विचारही करता येणार नाही. राहुल गांधी आपण एकत्र आलो आहोत, ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. फाटे फुटू देऊ नका, तुम्हाला डिवचलं जातंय, आता वेळ चुकली तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही,' असंही ते यावेली म्हणाले. 

Web Title: Uddhav Thackeray: 'I am not contesting to become Chief Minister again, if...' Uddhav Thackeray's public appeal to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.