मी बघितलेले उध्दव ठाकरे हे नव्हेत, हे विश्वासघातकी सरकार : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 11:19 AM2019-12-23T11:19:53+5:302019-12-23T14:38:39+5:30
मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा वडिलांना शब्द दिला होता असे म्हणणाऱ्या ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता का अशी विचारणा करत मी बघितलेले उध्दव ठाकरे हे नव्हेत असा टोला फडणवीस यांनी लगावला.
कोल्हापूर : मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा वडिलांना शब्द दिला होता असे म्हणणाऱ्या ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता का अशी विचारणा करत मी बघितलेले उध्दव ठाकरे हे नव्हेत असा टोला फडणवीस यांनी लगावला.
एका विवाह समारंभाच्यानिमित्ताने रविवारी फडणवीस कोल्हापुरात आले होते. त्यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. विश्वासघाती सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा एक पै चाही फायदा नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ते म्हणाले,आज शेतकरी अडचणीत आहे. त्याला तातडीने मदत देण्याची गरज होती. सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करतो अशी घोषणा करणाऱ्यांनी ‘यु टर्न’ घेतला आहे. आज अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असताना त्यांना ती दिली गेली नाही. सप्टेंबर २0१९ पर्यंतची मुदत घातल्याने अनेकजण यापासून वंचित राहणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. या सर्व बाबींविरोधात भाजप रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत राजकारणातून समाज विघटन करण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत. राज्याची आर्थिक स्थिती आम्ही असताना उत्तम होती. राज्य डबघाईला आले असल्याची चर्चा राष्ट्रवादी करते आणि आमच्यासोबत सत्तेत असलेली शिवसेना सुरात सूर मिसळते याचे आश्चर्य वाटते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, महेश जाधव, राहूल चिकोडे, विजय जाधव उपस्थित होते.
स्वरूप आणि राहुल महाडिक भाजपमध्ये
माजी खासदार धनंजय महाडिक यांचे सांगली जिल्ह्यातील चुलत बंधू स्वरूप आणि राहुल महाडिक यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर, महेश जाधव, अमल महाडिक आदी उपस्थित होते.