बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आज सत्तेत हे दुर्दैव; सुधीर मुनगंटीवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 09:11 PM2022-02-10T21:11:55+5:302022-02-10T21:12:28+5:30
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारला त्रास देत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रपूर-
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारला त्रास देत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चौकशीमुळे कुठलंही सरकार कधी अस्थिर होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना देखील अनेक चौकशांचा सामोरं जावं लागलं होतं. मग स्वत:ला तुम्ही वाघोबा म्हणवता आणि चौकशीला कसले घाबरता?, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणाले. तसंच मुनगंटीवार यांनी यावेळी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. ज्यांनी बाळासाहेबांवर कारवाई केली अशा लोकांसोबत आज उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
माझ्या मुलीच्या लग्नात फुलवाल्याचीही चौकशी केली गेली होती, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसंच कुणी कितीही प्रयत्न केले तरी मुंबईची दादा शिवसेनाच आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार टीका केली. "चौकशीमुळे कोणतंही सरकार कधी अस्थिर होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनाही त्रास दिला गेला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे हे देखील चौकशीला पूर्ण शक्तीनिशी सामोरं जात आहेत. मग स्वत:ला वाघोबा म्हणता आणि चौकशीला का घाबरता?", असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.
"आज ज्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना ज्यांनी अटक केली त्यांच्यासोबत आज त्यांचे सुपुत्र सत्तेत बसलेत. राजकारणात यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं", असंही मुनगंटीवार म्हणाले. त्यांच्या या विधानावरही आता प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.