भाजपाच्या बेरजेच्या राजकारणामुळे भारत संकटात - उद्धव ठाकरे
By Admin | Published: March 7, 2015 01:54 PM2015-03-07T13:54:18+5:302015-03-07T13:58:15+5:30
भाजपाने पीडीपीसोबत जम्मू काश्मीरमध्ये सत्ता काबीज असली तरी हे बेरजेचे राजकारण भाजपासोबतच देशालाही संकटात नेईल असे परखड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - भाजपाने मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी हातमिळवणी करुन जम्मू काश्मीरमध्ये सत्ता काबीज असली तरी हे बेरजेचे राजकारण भाजपासोबतच देशालाही संकटात नेईल असे परखड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. राष्ट्रहितासाठी कटू निर्णय घ्यावा लागतो म्हणून भाजपाने भारतविरोधी सईद यांच्याशी हातमिळवणी केली असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी काढला आहे.
जम्मू काश्मीरमधील सत्तास्थापनेविषयी उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला फटकारले आहे. जम्मू काश्मीरमधील निवडणुकीसाठी पाकिस्तान व दहशतवाद्यांना श्रेय देत सईद यांनी सर्वांचा अपमान केला असून अफझल गुरुचे अवशेष मागून पीडीपीने देशद्रोहाचा कळसच गाठला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. श्याम प्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू जम्मू काश्मीरमध्ये झाल्याची आठवण करुन देशभक्त मोदींनी काश्मीरप्रश्नी तडजोड करु नये अशी आशाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.