भाजपानंही शत्रू न वाढवता आता...; उद्धव ठाकरेंनी पुढे केला मैत्रीचा हात?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 09:35 AM2022-07-27T09:35:44+5:302022-07-27T09:40:02+5:30
मुख्यमंत्रिपद मला आव्हान म्हणून स्वीकारावे लागले. सर्व गोष्टी ठरवल्यानंतर भाजपाकडून त्या नाकारण्यात आल्या म्हणून मला ते करावं लागलं असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
मुंबई - आपल्या देशात सध्या लोकशाही संपून हुकुमशाही आली असे मी म्हणणार नाही. परंतु ज्या दिशेने पावलं पडताहेत ती पाहता ही लक्षणं काही बरी नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. देशातील सर्व राज्यांनी एकत्र यायला हवं. एकदा लढा उभा राहिला की देश जागा होईल. भाजपानेसुद्धा अधिक शत्रू न वाढवता ज्याला आपण आरोग्यदायी राजकारण म्हणतो असं हेल्दी पॉलिटिक्स करावं असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीतून केले आहे.
मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा आणि आम्ही मित्रच होतो. २५-३० वर्षे आम्ही सोबतच होतो. तरीसुद्धा २०१४ ला युती तोडली. कारण काहीही नव्हतं. तेव्हा आपण हिंदुत्व सोडलेले नव्हतं आणि आजही सोडलेले नाही. तेव्हासुद्धा भाजपाने शेवटच्या क्षणाला शिवसेनेशी युती तोडली होती. त्यावेळी तर आम्ही मित्रच होतो. २०१९ ला काय मागत होतो? मी अडीच वर्षासाठी शिवसेनेकरिता मुख्यमंत्रिपद मागत होतो आणि द्यायचं ठरलं होतं. ते मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी नव्हतं. मी हे का मागितले? कारण सरत्या काळामध्ये शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते की शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत माझं ते वचन अजूनही अर्धवटच आहे असे म्हणाले लागेल. कारण मी मुख्यमंत्री बनेन असं म्हणालो नव्हतो. मुख्यमंत्रिपद मला आव्हान म्हणून स्वीकारावे लागले. सर्व गोष्टी ठरवल्यानंतर भाजपाकडून त्या नाकारण्यात आल्या म्हणून मला ते करावं लागलं असं बरं झालो मुख्यमंत्री, कारण मी आता होऊन गेलेलो आहे काय प्रॉब्लेम तुम्हाला? तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.
भाजपाचे जुनेजाणते नेते आजही संपर्कात
देवेंद्र फडणवीसांसोबत भाजपा असे का वागले समजत नाही. तो त्यांच्या पक्षांतर्गत विष. आहे. त्यांच्या पक्षातील जुनेजाणते निष्ठावान त्यावेळी आमच्या बरोबर युतीत असणारे अनेक नेते आजही माझ्या संपर्कात आहेत. पण ते निष्ठेने भाजपासोबत आहेत. त्यांच्याबद्दल मला गैरसमज करू द्यायचा नाही. त्यांना शिवसेनेसोबत यायचं आहे. मी उगाच पोकळ दावा करणार नाही. मात्र त्यांना सध्याच्या गोष्टी पटत नाहीत. पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपाचे काम करताहेत. बाहेरच्यांना सर्व दिलं जातंय त्यांच्या डोक्यावरती बाहेरची माणसं बसवली. विधान परिषदेत तेव्हाचे विरोधी पक्षनेते, आता मुख्यमंत्री इतर पदांवरही बाहेरचे तरीही ते निष्ठा म्हणून काम करत आहेत असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितले.