Uddhav Thackeray Interview : ती सडलेली पानं...; उद्धव ठाकरेंनी सांगितली 'वर्षा'वरील दोन झाडांची गोष्ट, बंडखोरांना चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 09:09 AM2022-07-26T09:09:31+5:302022-07-26T09:11:39+5:30
झडलेली, सडलेली पानं केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आता नवीन कोंब फुटायला लागले आहेत - उद्धव ठाकरे
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. दरम्यान, सडलेली पानं झडताहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला.
“सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पानं सगळं झाडाकडून घेऊनही ती गळून पडताहेत. आणि हे बघा, झाड कसं उघडंबोडपं झालंय असं दाखवायचा ते प्रयत्न करताहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
पानंकेराच्याटोपलीत टाकण्याची प्रक्रिया सुरू
“झडलेली, सडलेली पानं केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आता नवीन कोंब फुटायला लागले आहेत. शिवसेनेचं तरुण आणि युवांशी नातं शिवसेनेच्या जन्मापासूनच आहे. मात्र एक आहे, अजूनही मोठय़ा संख्येने ज्येष्ठ शिवसैनिक येऊन भेटताहेत. ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केलं आहे, ज्यांना आपण पहिल्या पिढीचे म्हणू. ज्यांनी शिवसेनेचा संघर्ष पाहिलाय. स्वतः संघर्ष केलाय. त्यांना शिवसेना म्हणजे काय ते नेमकं कळलेलं आहे. त्यांना शिवसेनेकडून काही मिळावं ही अपेक्षा नव्हती आणि आजही नाही. पण ते येऊन आशीर्वाद देताहेत. हेच आशीर्वाद शिवसेनेला बळ देतील,” असेही त्यांनी नमूद केले.
ती सडलेली पानं
मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की, ज्या वेळी मी ‘वर्षा’त राहात होतो तेव्हाचा अनुभव कथन केला होता. या घराच्या आवारातच दोन झाडं आहेत. यातील एक गुलमोहराचं आणि दुसरं आहे बदामाचं झाड आहे. दोन्ही झाडं मी साधारणतः गेली दोन-एक वर्षे बघतोय. ज्याला आपण पतझड म्हणतो, पानगळ त्यात पानं पूर्ण गळून पडतात. फक्त काड्या राहतात. आपल्याला वाटतं, अरे या झाडाला काय झालं? पण दोन ते तीन दिवसांत पुन्हा नवीन कोंब येतात, अंकुर येतात आणि मी बघितलंय, आठ ते दहा दिवसांत ते बदामाचं झाड पुन्हा हिरवंगार झालं. गुलमोहरसुद्धा हिरवागार झाला. म्हणून ही सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत. जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आणखी वाचा -
'मातोश्री'वर येण्याची तुमची इच्छा नियतीनेच पूर्ण केली?; उद्धव ठाकरे रोखठोक बोलले
शिवसेनेच्या बाबतीत विश्वासघाताचं राजकारण का होतं?; उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही प्रोफेशनली…”