काय झाडी, काय डोंगर...; उद्धव ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांना विचारला खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 09:18 AM2022-07-26T09:18:29+5:302022-07-26T09:19:28+5:30

Uddhav Thackeray Interview: फास्ट फूडचा जमाना आला आहे. तुम्ही फोन केलात की दहा मिनिटांत, पंधरा मिनिटांत, वीस मिनिटांत पार्सल आलंच पाहिजे. तसं मी पक्षात गेलो की, थोड्या दिवसांत मला काहीतरी मिळालंच पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Interview: Thackeray Criticized on Shahaji Patil | काय झाडी, काय डोंगर...; उद्धव ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांना विचारला खोचक सवाल

काय झाडी, काय डोंगर...; उद्धव ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांना विचारला खोचक सवाल

Next

मुंबई - महाराष्ट्र किती सुंदर आहे. ग्रामीण भागातील आमदारांना महाराष्ट्राच्या या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते. पण मला एक कळलंच नाही मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात? असा खोचक सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना विचारला आहे. ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीची तुम्हाला ओढ नाही. प्रेम नाही. त्या मातीचं वैभव दिसलं नाही असा टोला ठाकरेंनी लगावला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी स्वत: कलाकार आहे. त्याच्यावरूनही त्यावेळी चेष्टा झाली होती. पण मी गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली आहे. पंढरपूरच्या वारीची केली आहे. त्यावेळी मी जो महाराष्ट्र बघितला. त्यावेळी पावसाच्या सुमारास ही फोटोग्राफी केली. इतका नटलेला, थटलेला महाराष्ट्र, दऱ्याखोऱ्या छान फुलांची बहरून जातात. मी तर शहरी बाबू. तुम्ही तर ग्रामीण भागातले. त्या ग्रामीण भागात राहून तुम्हाला महाराष्ट्राचं सौदर्यं दिसलं नाही. त्याचं वर्णन करावंसं कधी वाटलं नाही आणि डायरेक्ट गुवाहाटी? मी गुवाहाटीला वाईट म्हणत नाही. प्रत्येक प्रदेश चांगलाच असतो पण हे काय आपल्या मातीसाठी करणार? असा सवाल त्यांनी केला. 

तसेच विरोधी पक्ष हासुद्धा तेवढाच सुसंस्कृत पाहिजे. संवेदनशील पाहिजे आणि तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त सत्ताधारी पक्ष हा संवेदनशील आणि सुसंस्कृत असला पाहिजे. आता संवेदनशीलता आणि सुसंस्कृतापणा हा कुठेतरी रसातळाला जायला लागला आहे. पिढ्या बदलताहेत आणि सत्तेची हाव आता झालंय. फास्ट फूडचा जमाना आला आहे. तुम्ही फोन केलात की दहा मिनिटांत, पंधरा मिनिटांत, वीस मिनिटांत पार्सल आलंच पाहिजे. तसं मी पक्षात गेलो की, थोड्या दिवसांत मला काहीतरी मिळालंच पाहिजे. नाही दिलं तर माझ्याकडे दुसरा तयार आहेच असा टोलाही शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे. 

मानेतील क्रॅम्पनंतर काय-काय घडलं 
‘‘सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही. पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. “त्या काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार? तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

Web Title: Uddhav Thackeray Interview: Thackeray Criticized on Shahaji Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.