तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 10:32 AM2024-05-12T10:32:30+5:302024-05-12T10:36:27+5:30
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. त्यात ठाकरेंनी भाजपाच्या आरोपावर सडेतोड प्रत्युत्तर दिले
मुंबई - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी केक खाल्ला होता. बिनबुलाए मेहमानसारखं पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाहीत. औरंगजेब गुजरातमध्येच जन्मला होता, जसे हे दिल्लीत गेले तसे औरंगजेब आग्र्यात होता असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
विरोधकांकडून सातत्याने तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही औरंगजेबाचे फॅन झाला आहात असा आरोप केला जातो, असा प्रश्न संजय राऊतांनीउद्धव ठाकरेंना विचारला, त्यावर ते म्हणाले की, पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी केक खाल्ला होता. बिनबुलाए मेहमान, पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाहीत. औरंगजेब गुजरातमध्येच जन्मला होता, जसे हे दिल्लीत गेले तसे औरंगजेब आग्र्यात होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी २७ वर्ष इकडेच होता. त्याने रोड शो वैगेरे केले असतील तर कल्पना नाही. पुन्हा तो आग्र्याला जाऊ शकला नाही. कदाचित त्यानेही मोठमोठ्या सभा, रोड शो केले असतील. औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणारे मराठे आजसुद्धा आहेत असं ठाकरेंनी म्हटलं.
तसेच पुलवामाबाबत जे घडले, त्याबाबत तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विस्तवासारखे असलेले वास्तव हे जगासमोर मांडले, त्यावर कुणी उत्तर देऊ शकले नाहीत. सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. घटनात्मक पदावर असलेल्या माणसाने जेव्हा भीषण सत्य जनतेसमोर आणले त्यावर कुणी चर्चा करत नाही. काल जे घडले, पुलवामा हल्ला झाला त्याला जबाबदार कोण?, अजूनही काश्मीर अशांत असेल तर कशाला मते द्यायची, एकाबाजूला चीन अतिक्रमण करतोय, गावांची नावे बदलतोय तरीही आपल्याला काय वाटत नाही. मोदी मणिपूरबाबत बोलत नाही, इतर मुद्द्यावर बोलत नाही. परंतु जणू काही उद्धव ठाकरे हा एक प्रश्न देशासमोर आहे. अशाप्रकारे मोदी-शाह महाराष्ट्रात येतायेत, हे काहीतरी आक्रीत घडतंय. उद्धव ठाकरेंना संपवून काश्मीर शांत होणार आहे का? उद्धव ठाकरेंना संपवलं म्हणजे चीन परत जाणार आहे का? मणिपूरमधील महिलांची इज्जत परत मिळणार आहे का? मोदींकडे याचे उत्तर काय? असा सवाल ठाकरेंनी केला.
दरम्यान, मोदी अयोध्येला गेले नव्हते तेव्हा मी शिवसैनिकांना घेऊन अयोध्येला गेलो होतो. शिवजन्मभूमीची माती घेऊन मी राम मंदिराला गेलो होतो. त्यानंतर वर्षभरात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला. त्यानंतर महिनाभरात माझ्या ध्यानीमनी नसताना मी मुख्यमंत्री झालो. त्यानंतरही मी अयोध्येला गेलो होतो. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शंकराचार्य नव्हते तर भ्रष्टाचारी होते. मी २२ तारखेला काळाराम मंदिरात गेलो होतो. त्या मंदिराचे वेगळे वैशिष्टे आहे. या मंदिरासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता. हा राम कुणाची मक्तेदारी नाही. आज जी भाजपाची मक्तेदारी होतेय, म्हणून मी नारा दिला होता, भाजपा मुक्त राम मला हवा. तसेच त्यावेळी बुरसटेले गोमूत्रधारी त्यांच्याविरोधात बाबासाहेबांनी लढा दिला होता. त्या काळाराम मंदिरात जाऊन मी आरती केली, पूजा केली. अयोध्येतील राम मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे झालंय असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईत कोणाच्या आशीर्वादाने मराठी माणसांवर दादागिरी चालते?
मराठी माणसं कधीही इतर राज्यात दादागिरी करत नाहीत. पण मुंबईत कोणाच्या आशीर्वादाने हे चालतं? त्या लोकांना बळ देण्यासाठी मोदी रोड शो करणार आहेत का? हा प्रश्न मराठी माणूस करणार. काही लोक भलेही गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लिमसुद्धा, आपण जे कोरोना काळात जे काम केले ते कधीच विसरले नाहीत. उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या, महाराष्ट्रात असं घडले नाही. त्यावेळी मोदी रिकाम्या थाळ्या वाजवत होते, त्याने कोरोना जात नाही. महाराष्ट्राच्या जनतेने जे जे मी सांगत गेलो ते ऐकत गेले, त्यात मी कुठेही भेदभाव केला नाही. गुजरातबद्दल माझ्या मनात आकस नाही. गुजरातही आमचाच आहे. पण हा भाव गुजराती लोकांनी इथं राहणाऱ्यांनी ठेवला पाहिजे. ९२-९३ च्या दंगलीत शिवसेनेने त्यांना वाचवलं आहे. तेव्हा मोदी कुठे होते असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
निवडणुकीत राम, निकालानंतर मरा
निवडणुकीचे टप्पे टाकले काय, सरपटी टाकले तरी निवडणुकीच्या निकालात ते सरपटणार आहेत. तुम्ही १० वर्ष काय केलेत, तुम्हाला पराभवाचे भूत समोर दिसायला लागल्यावर तुम्ही राम राम राम करावं लागलं. मात्र निवडून आल्यानंतर तुम्हाला मरा, मरा, मरा करावे लागते. शेतकरी आत्महत्या करतायेत, त्याकडे लक्ष नाही. महिलांवर अत्याचार झाले तरी चालतील ५ वर्षांनी बघू. शेतकरी दिल्लीत आले त्यांच्यावर बंदूक रोखता, शेतकऱ्यांना दहशतवादी, शहरी नक्षलवादी संबोधले. निवडणुकीत रामाचे नाव, निवडून दिल्यानंतर लोकांना मरा मरा करतात असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.
अच्छे दिन नव्हे तर काळे दिवस येतील
१० वर्षात ज्यांनी थापा मारल्या त्यांना पुन्हा डोक्यावर घेतले, तर पुन्हा थापाच खाव्या लागतील. आता जर यांना फेकून दिले तर देशात शांतता नांदेल, कायदा सुव्यवस्था राहील अन्यथा काळे दिवस येतील. अच्छे दिन आले नाहीत, पण काळे दिवस येऊ शकतात अशी भीती उद्धव ठाकरेंनी दाखवली.
पैशासाठी मतदान करू नका, जनतेला आवाहन
तुम्ही पैशांवर आयुष्य विकू नका, पैसे घेऊन मत देणे म्हणजे तुमच्या आयुष्याची आणि भविष्याची वाट लावणे आहे. तुमच्या मुलाबाळांचे आयुष्य विकण्यासारखे आहे. भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा वाटला जातो. निवडणूक रोखेबाबत अर्थमंत्र्यांच्या पतीनेच सांगितले, हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे, त्याला मोदी गेट नाव दिलंय. अमेरिकेत वॉटर गेट प्रसिद्ध झालं, मोदी गेटची तुलना वॉटर गेटची झालीय. तोच पैसा मतं विकत घेण्यासाठी वापरतायेत. आम्ही हे सरकार घालवण्यासाठी प्रयत्न करतोय, लोकांमध्ये जागृती झालीय. आता रायगडालाच नव्हे तर संपूर्ण देशाला जाग आली आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.