उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना; मनसे नेते प्रकाश महाजनांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 03:32 PM2024-07-22T15:32:59+5:302024-07-22T15:33:28+5:30
विशालगडावरील अतिक्रमण आणि राज्यात आरक्षणावरून पेटलेला वाद यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाष्य केले आहे.
नाशिक - उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना आहेत. संजय राऊत यांनी विशालगडाच्या अतिक्रमणावर बोललं पाहिजे असं सांगत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
प्रकाश महाजन बोलले की, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना आहेत. मुस्लीम त्यांच्या आणि ते मुस्लीमांच्या इतके प्रेमात पडले की शंकराचार्यांना घरी आणून त्यांनी पाय धुतले तरी हिंदू त्यांच्याकडे वळतील असं वाटत नाही. संजय राऊतांनी विशालगडाच्या अतिक्रमणावर बोलावं. सकाळचा माईक बंद का करता, त्यावर बोलले पाहिजे असा टोला त्यांनी लगावला. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणून केला. त्यावर पत्रकाराने प्रश्न विचारताच महाजनांनी प्रतिक्रिया दिली. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यातील अथवा राज्याबाहेरचा कुठलाही किल्ला हा तीर्थक्षेत्र आहे. त्यावर अतिक्रमण होता कामा नये. विशालगडावर जुन्या जागांवर अतिक्रमण झालंय आणि अतिक्रमण करणाऱ्याची बाजू घेणे म्हणजे तुम्ही बेकायदेशीरपणाला पाठिंबा देताय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांची समाधी कुठे हे कुणाला माहिती आहे का, त्यांची समाधी किती विपन्न अवस्थेत आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी विशालगडावर सती गेल्यात. काहींना फक्त मतांचे राजकारण करायचे आहे. गजापूर गावात नवीन मुस्लीम वस्ती कुठून उभी राहते, यासिन भटकळ तिथे येऊन राहतो कसा? या गोष्टीचे तुम्ही समर्थन करताय? असा सवालही मनसे नेते प्रकाश महाजनांनी विचारला.
दरम्यान, महाराष्ट्रात आरक्षणावरून वणवा पेटला आहे तो जर खरेच शरद पवारांना शांत करायचा असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी दोन्ही आंदोलकांना सोबत घ्यावे आणि साम्यजंस्याने चर्चा करावी. संवाद करावा, एकमेकांच्या गळ्यावर सुरी ठेवू नका. निष्पाप समाजघटक या आंदोलनात बळी जातोय असं सांगत शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाष्य केले. त्याशिवाय माझा पक्ष, माझा नेता जातपात नाहीत. आरक्षण जातीवर नको तर आर्थिक परिस्थितीवर असावं. तरीपण घटनेच्या चौकटीत जे काही बसतंय ते पाहा. मराठा समाजाला आरक्षण द्यायला सगळे पक्ष तयार असतील मग घोडे अडलंय कुठे? आरक्षणाचा वणवा पेटणं हे काही लोकांच्या राजकीय अस्तित्वासाठी सुरू आहे जे सध्या लयाला चालले होते मात्र त्याआधारे लोकसभेत काहींना उभारी मिळाली अशी टीकाही त्यांनी केली.