"उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लीम मते चालतात मग इम्तियाज जलील का चालत नाही?"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 07:05 PM2024-08-14T19:05:01+5:302024-08-14T19:05:55+5:30

उद्धव ठाकरेंनी जुनी विचारधारा सोडली असून नवीन विचारधारा स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एमआयएमचा समावेश करण्यास त्यांची हरकत नसावी असं विधान इम्तियाज जलील यांनी केले आहे. 

"Uddhav Thackeray is the new secularist, he wants Muslim votes so why not Imtiaz Jalil?" - Imtiyaz Jaleel AIMIM | "उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लीम मते चालतात मग इम्तियाज जलील का चालत नाही?"

"उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लीम मते चालतात मग इम्तियाज जलील का चालत नाही?"

छत्रपती संभाजीनगर -  उद्धव ठाकरेंची विचारधारा राहिली कुठे? ज्या पक्षाचा जन्म काँग्रेसविरोधात झाला. बाळासाहेबांनी जो पक्ष उभा केला तो मुस्लीम समाजाला टार्गेट करण्यासाठी केला होता. दक्षिण भारतीयांना टार्गेट करण्यासाठी केला होता आणि काँग्रेसविरोधात केला होता. आता ज्या उद्देशातून पक्ष स्थापन झाला होता तो आता बाजूला पडला आहे. मुस्लीम समाजही उद्धव ठाकरेंना मतदान करत आहे. कारण तुम्ही जुनी विचारधारा सोडली आणि नवीन विचारधारा स्वीकारली आहे. मुस्लीम मते चालतात मग इम्तियाज जलील का चालत नाही? असा थेट सवाल एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

जलील यांनी शहरात पत्रकार परिषद घेत इंडिया आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली. इम्तियाज जलील म्हणाले की, इंडिया आघाडीला देशभरात, महाराष्ट्रात मुस्लिमांनी मतदान केले. ते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला मतदान झाले. आता त्यांनी लोकसभेला जशी लाट मिळाली तीच विधानसभेला मिळणार असा समज करून घेऊ नये. या २-३ महिन्यात लोकांनी बरेच अनुभव घेतले. विशालगडाचा जो प्रकार झाला ते करणारे कोण, कुठल्या पक्षाचे हे बघितले. मग विधान परिषदेची निवडणूक आली तेव्हा ३० वर्षानंतर मुस्लीममुक्त विधान परिषद करण्यात आलेली आहे. अनेक मुद्दे आहेत ज्यामुळे लोकांना आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला होता असं वाटू लागले असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय वक्फ बोर्डाचा विषय लोकसभेत आला तेव्हा त्यांचे एकही खासदार तिथे उपस्थित नव्हते, विधेयक आणले तेव्हा ते सभागृहातून बाहेर पळाले. तुमची लढाई तुम्हाला लढायची आहे आम्ही फक्त दर ५ वर्षांनी तुमच्याकडे मतदान मागायला येणार असं त्यांना वाटते. ५ वर्षात तुमच्यावर काही अन्याय झाला तर आम्ही मूग गिळून गप्प बसणार. कमीत कमी विधेयकावर बोलायला हवं होते. तुमची भूमिका काय हे स्पष्ट करायला हवी होती असा टोला इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

दरम्यान, मालेगाव, धुळे, नांदेड, मुंबईतील काही भाग जिथे आमची मजबूत पकड आहे तिथे लढवण्याची तयारी आहे. महाराष्ट्रात काय परिस्थिती हे माहिती आहे. कागदावर ही युती-आघाडी दिसणार आहे पण इतके अपक्ष पक्षाविरोधात जाऊन स्वबळावर लढणार आहेत. आम्ही ३० जागांवर चाचपणी केली आहे. या ३० जागांवर आमचा सर्व्हे सुरू आहे. आघाडीची परिस्थिती काय असेल त्यावर जागा वाढवायच्या कमी करायचा तेव्हा निर्णय होईल असंही जलील यांनी स्पष्ट केले. 

युती, आघाडी केवळ कागदावर  

आता राजकारणात कुठलीही गॅरंटी राहिली नाही. निवडणुकीनंतर शरद पवार मविआसोबत राहतील का, अजित पवार इकडे येतील का, मुख्यमंत्रिपद न मिळाल्यावर एकनाथ शिंदे काय भूमिका घेतील हे कुणीही सांगू शकत नाही. ३ पक्ष एकत्र बसले आहेत परंतु तिघांना एकमेकांवर विश्वास नाही. प्रत्येकाने पाठीमागे खंजीर लपवून ठेवला आहे. संधी मिळताच कुणाला मारतील माहिती नाही. निवडणूक आल्यानंतर कुणी कुणाचं ऐकणार नाही असं भाष्य इम्तियाज जलील यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर केले. 

इतके मोठे पक्ष, स्वबळावर लढण्याची हिंमत कुणात नाही 

इतके मोठे पक्ष मग इतर पक्षांच्या कुबड्या का लागतात, भाजपा इतका मोठा पक्ष मग त्यांच्यात हिंमत नाही का एकटं लढायची. एकनाथ शिंदे नको, अजित पवारही नको असं बोलायची. एकनाथ शिंदे इतके आमदार आणले मग एकटं लढण्याची हिंमत का नाही. शरद पवार महाराष्ट्रात इतकी वर्ष राजकारण करतायेत मग का २८८ जागा लढवू शकत नाहीत. ६ पक्ष कागदावर युती आणि आघाडी आहे. निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येकाला जास्त जागा हव्यात. प्रत्येक पक्षाने उमेदवारांना लढण्याचे संकेत दिले आहेत असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.  
 

Web Title: "Uddhav Thackeray is the new secularist, he wants Muslim votes so why not Imtiaz Jalil?" - Imtiyaz Jaleel AIMIM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.