Uddhav Thackeray Live : "एकदा ठरवूया, तुम्ही या आणि..."; मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंसह आमदारांना केलं जाहीर आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 06:14 PM2022-06-22T18:14:23+5:302022-06-22T18:18:25+5:30
Uddhav Thackeray Live: हिंदुत्वाच्या मुद्दयावरून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी भाजपासोबत सरकार करावं अशी मागणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.
मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. हिंदुत्वाच्या मुद्दयावरून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी भाजपासोबत सरकार करावं अशी मागणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.
काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होता. पण माझ्या लोकांनाच मी नको. सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा इथे माझ्याशी चर्चा करायला हवी होती. एकाही आमदाराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको असं म्हटलं तर आज संध्याकाळी मी वर्षाहून मातोश्रीला मुक्काम हलवतो. उगाच का असं करताय? मी राजीनामा तयार करून ठेवला. या आणि राजभवनात पत्र घेऊन जा, सत्तेसाठी मी लाचार नाही असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले. तसेच या समोर बसा, मी देतो राजीनामा. जे आमदार गायब आहेत त्यांनी माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनात जावं कारण मला कोरोना झाला आहे असं म्हटलं आहे.
"एकदा ठरवूया, तुम्ही या किंवा तिथून फोन करा आणि सांगा तुमचं आम्ही फेसबुक लाईव्ह पाहिलं. आम्हाला यायला संकोच वाटतो पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला नकोत हे स्पष्ट सांगा. मी या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे" असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
सत्तास्थापनेवेळी शरद पवारांनी बैठकीनंतर मला बोलावलं. तेव्हा तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. कारण दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते होते. मग जिद्दीने अनुभव नसताना मी जबाबदारी स्वीकारली. राजकारणात वळणं असतात. आजपर्यंत मला प्रशासनाने खूप सहकार्य केले. होय, मला धक्का बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगितले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर समजू शकतो. दोघांची विचारसरणी वेगळी आहे. मात्र त्या दोघांनी माझ्यावर भरवसा ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नको असतील तर राजीनामा देण्यास तयार आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.