'शिवसेना तुमची आई होती, त्याच आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली', उद्धव ठाकरे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 06:50 PM2022-10-09T18:50:46+5:302022-10-09T18:51:07+5:30
'हिंमत असेल तर, बाळासाहेबांच्या नावाशिवाय निवडणूक लढवून दाखवा.'
मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने काल मोठा निर्णय दिला. ठाकरे आणि शिंदे गटाला धक्का देत, आयोगाने चिन्ह गोठवले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
आईच्या काळजात कट्यार घुसवली
उद्धव ठाकरे म्हणाले, ''काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला. ज्या धनुष्यबाणाची शिवसेनाप्रमुख पूजा करत होते, आजही पूजा होते, ते चिन्ह या 40 लोकांमुळे गोठले. तुम्ही भगवान रामाचे धनुष्यबाण गोठवले. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला, जी शिवसेना तुमची आई होती, त्याच आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली.''
'निवडणूक आयोगाला 3 चिन्हे आणि 3 नावांचा पर्याय दिलाय; आयोगाने लवकर निर्णय घ्यावा'- उद्धव ठाकरे
निष्ठा विकत घेता येत नाही
ते पुढे म्हणाले, ''त्यांना आता आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. त्यांच्या मागे असलेली महाशक्ती खूप खुश असेल. ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, हिंदू अस्मिता जपली, त्याच शिवसेनेचे नाव तुम्ही गोठवले. चिन्ह गोठवले, पण निष्ठा विकत घेता येत नाही. आता शिवसैनिकांना दमदाट्या सुरू आहेत. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी शिवसेनेवर बंदी घातली नव्हती. त्यांनी जे केले नव्हते, ते तुम्ही करत आहात.''
हिंमत असेल तर...
''माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी आत्मविश्वासाने जगायचे शिकवले. शिवसैनिक माझ्या पाठिशी आहेत. माझे तुम्हाला आव्हान आहे. बाळासाहेबांचे नाव न घेता निवडणूक लढवा. तुम्हाला बाळासाहेब हवे, पण त्यांचा मुलगा नको. ही शिवसेना कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी तयार आहे. आमचे चिन्ह गोठवले, हा अन्याय आहे. मला हा निकाल अपेक्षित नव्हता, पण माझा न्यायालयावर विश्वास आहे, न्याय नक्की मिळेल,'' असेही उद्धव ठाकरे म्हणाले.