Uddhav Thackeray Live: … तर मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायलाही तयार, उद्धव ठाकरे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 06:14 PM2022-06-22T18:14:10+5:302022-06-22T18:14:31+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होतो. पण माझ्या लोकांनाच मी नको - उद्धव ठाकरे
काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होतो. पण माझ्या लोकांनाच मी नको. सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा इथे माझ्याशी चर्चा करायला हवी होती. एकाही आमदाराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको असं म्हटलं तर आज संध्याकाळी मी वर्षाहून मातोश्रीला मुक्काम हलवतो. उगाच का असं करताय? मी राजीनामा तयार करून ठेवला. या आणि राजभवनात पत्र घेऊन जा, सत्तेसाठी मी लाचार नाही असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले.
कोणताही मला मोह नाही, मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे. मोह मला खेचू शकत नाही. जे काही आहे ते समोर येऊन बोला. समोर बसा मी राजीनामा देतो. मी राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो. माझं राजीनाम्याचं पत्र घेऊन जावं. हा आगतिक पणा, लाचारी, मजबूरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसेना प्रमुखांनी जोडलेला शिवसैनिक आहे तोवर मी भीत नाही, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
ज्या शिवसैनिकांना वाटत असेल मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक आहे, मी शिवसेनेचं पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार आहे. पण हे सांगणारा विरोधक नाही, मी माझ्या शिवसैनिकांना बांधील आहे. त्यांनी सांगावं, मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे. मी मुख्यमंत्रीपद सोडल्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर आनंदानं मान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदेंना चपराक
“अनेकजण म्हणत आहेत की, शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेली आहे. पण, २०१२ मध्ये बाळासाहेब गेले, त्यानंतर २०१४ मध्ये सेना एकटी लढली. त्यानंतर आताही लढत आहोत. तेव्हाही शिवसेना बाळासाहेबांची होती, आताही आहे. माझ्यासोबत आता जे सहकारी आहेत, ते बाळासाहेबांच्या सोबतचेच आहेत. मधल्या काळात त्यांना जे काही मिळालं, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेनंच दिलं,” असंही ठाकरे म्हणाले.