'निवडणूक आयोगाला 3 चिन्हे आणि 3 नावांचा पर्याय दिलाय; आयोगाने लवकर निर्णय घ्यावा'- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 06:38 PM2022-10-09T18:38:53+5:302022-10-09T18:38:58+5:30
''शिवसेना आणि तुमचा काहीही संबंध नाही. पक्षाचे नाव नाव माझ्या आजोबांनी दिले, वडीलांनी रुजवले, त्याचा तुम्ही घात करताय. "
मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने काल मोठा निर्णय दिला. ठाकरे आणि शिंदे गटाला धक्का देत, आयोगाने चिन्ह गोठवले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला लवकरात लवकर पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याची विनंती केली. तसेच, शिंदे गट आणि भाजपवरही हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हाले की, ''कालचा निवडणूक आयोगाने दिलेला निकाल अपेक्षित नव्हता. आम्ही निवडणूक आयोगाला कालच पत्र पाठवून तीन चिन्हे आणि नावे दिली आहेत. लवकरच अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आम्हाला चिन्ह आणि नावाची गरज आहे. माझी आयोगाला विनंती आहे की, त्यांनी लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा."
स्वतः शिवसेनाप्रमुख व्हायला निघालेत
शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणतात की, "शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको म्हणून काही जणांनी आपल्याशी गद्दारी केली. ज्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते, त्यांनी ते मिळवले. इतके दिवस आम्ही सहन केले, पण आता अती होत आहे. शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको, इथपर्यंत ठीक होते. पण, आता शिवसेना प्रमुख पद घेण्याचा प्रयत्न सुरू आहे," असा आरोप त्यांनी यावेळी केला.
यांचा उपयोग संपल्यावर...
ते पुढे म्हणतात, ''शिवसेना आणि तुमचा काहीही संबंध नाही. पक्षाचे नाव नाव माझ्या आजोबांनी दिले, वडीलांनी रुजवले, त्याचा तुम्ही घात करताय. आज अनेकांचा फोन येतोय, अनेकजण रडत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, संकट येत असतात, संकटातही संधी असते, तीच संधी मी शोधतोय. भारतीय जनता पक्ष त्यांचा उपयोग करुन घेताहेत. यांचा उपयोग संपल्यानंतर यांनाही फेकून देतील,'' अशी टीकाही त्यांनी केली.