मुख्यमंत्री पदावरील दावा मागे घेतोय, हे सांगायला उद्धव ठाकरे पवारांना भेटले; शिंदे गटाचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 04:08 PM2023-04-25T16:08:50+5:302023-04-25T16:09:31+5:30
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसोबत गेल्या आठवड्यात शरद पवारांची भेट घेतल्याने पडद्यामागे बरेच काही सुरु असल्याचा अंदाज जनतेलाही आला आहे. एकनाथ शिंदे गावी गेल्याने त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाण्याची अफवा आणि त्यांनी व्यक्त केलेली मुख्यमंत्री पदाची इच्छा, यावरून राज्यात येत्या काळात राजकीय भूकंप होण्याचा अंदाज भाजपा सोडून साऱ्यांनीच वर्तविला आहे. अशातच उद्धव ठाकरेंनीसंजय राऊतांसोबत गेल्या आठवड्यात शरद पवारांची भेट घेतल्याने पडद्यामागे बरेच काही सुरु असल्याचा अंदाज जनतेलाही आला आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गावी गेल्याने त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. याला शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. मुख्यमंत्री सुट्टीवर नाहीत तर शासकीय दौऱ्यावर गेले आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली आहे. त्यांच्या गावी पूजा आहे ती अटेंड करायला ते गेले आहेत. एक दिवस मुख्यमंत्री गावी गेले असतील आणि तिथून पण काम करत असतील तर संजय राऊतांनी अडीज वर्षे तत्कालीन मुख्यमंत्री दालनात कधी गेले नाहीत, कधी मंत्रालयात बसले नाहीत, कधी दौरा केला नाही त्यावर का गप्प बसलेले, अशी टीका म्हस्के यांनी केली आहे.
सकाळी उठायचे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांविरुद्ध बोलायचे. सत्तासंघर्षाचा निर्णय कोण देणार आहे? सुप्रीम कोर्टाचा निर्णय यांना माहिती पडला आहे का? सुप्रीम कोर्टाने यांना सांगितले आहे का? तुम्ही बघा थोड्या दिवसांनी ते त्यांचे कपडे फाडून रस्त्यावर धावणार आहेत, असा टोलाही लगावला.
राज्यात भूकंप होणार आहे, हे नक्की आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे जे १५ आमदार आणि ३,४ खासदार आहेत, ते शिवसेना भाजपा युतीला पाठिंबा देणार आहेत, असा दावाही म्हस्के यांनी केला.
याचबरोबर उद्धव ठाकरेशरद पवारांना कशासाठी भेटले, यावरही म्हस्के यांनी मोठा दावा केला आहे. आम्ही आमचा मुख्यमंत्री पदावरील दावा मागे घेतोय, असे ठाकरेंनी पवारांना सांगितलेय. ही शोकांतिका आहे, अशी टीका म्हस्के यांनी केली.