महाविकास आघाडीमध्ये मोठी घडामोड, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 08:34 PM2023-04-11T20:34:43+5:302023-04-11T20:36:42+5:30
Uddhav Thacleray Meets Sharad Pawar: महाविकास आघाडीमध्ये आज मोठी घडामोड घडत असून, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्रवीर सावरकरांचा अवमान, गौतम अदानी प्रकरणााची जेपीसी चौकशी, ईव्हीएमचा मुद्दा आणि पंतप्रधान मोदींच्या पदवीचा विषय या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीमधील ठाकरे गट, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मतभेद दिसून आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमधील ऐक्याला तडे गेले आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये आज मोठी घडामोड घडत असून, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये सिल्व्हवर ओकवर चर्चा सुरू आहे. तसेच या दोन्ही नेत्यांसोबत संजय राऊत हे सुद्धा उपस्थित आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांची घेतलेली भेट ही पूर्वनियोजित असल्याचे सांगण्यात येत आहे. काल संजय राऊत यांनी शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट घेतली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
दरम्यान, राज्यात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र असले तरी त्यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवरून मतभेद दिसून येत आहेत. एकीकडे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी आणि गौतम अदानी समुहातील २० हजार कोटी रुपयांवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आक्रमक झाले असताना शरद पवार यांनी अदानी प्रकरणात जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे मत मांडले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्रा हा काही फार मोठा विषय नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद दिसून आले होते.