राम सत्यवचनी, अयोध्येतून सत्याचा बोध घेऊन यावे; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 11:41 AM2023-04-08T11:41:39+5:302023-04-08T11:42:14+5:30
अयोध्येत जाण्याचा मार्ग आम्हीच दाखवला. मुख्यमंत्री कायदेशीर आहे की नाही हे लवकरच सर्वोच्च न्यायालय ठरवेल असं संजय राऊत यांनी सांगितले.
मुंबई - अयोध्येत कुणी जावं की नाही यावर बंधन असू शकत नाही. अयोध्या तीर्थक्षेत्र आहे कुणीही जावे. परंतु तिथून येताना सत्याचा बोध घेऊन यावे असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांना लगावला आहे. शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी व्हावा यासाठी भाजपानेही विशेष प्रयत्न केले आहेत.
या दौऱ्याबद्दल खासदार संजय राऊत म्हणाले की, राम सत्यवचनी आणि सत्याचे प्रतिक आहे. तिथे कुणी बेईमान जात असेल तर त्याला रामाचे आशीर्वाद मिळणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या आमदारांना अयोध्येचा रस्ता आम्हीच दाखवला. त्या रस्त्याने भरकटू नका. प्रभू श्री राम सगळ्यांचे आहेत. रामाच्या चरणी जाऊन महाराष्ट्रात केलेले पाप धुवायचे असेल तर प्रभू राम आशीर्वाद देत नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच मी गेले ४० वर्ष अयोध्येत जातो. शिवसेनेत अयोध्येत जावं ही माझी भूमिका मी उद्धव ठाकरेंना सांगितली. त्यानंतर ते सातत्याने ते अयोध्येत जातात. मुख्यमंत्री असताना, नसतानाही गेले. हजारो शिवसैनिकांना आम्ही आमंत्रण दिले होते त्यात एकनाथ शिंदेही होते असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, इतकी वर्ष भाजपा नेत्यांना अयोध्येत जावं वाटले नाही. आता इच्छा असेल तर जावे. अयोध्येत जाण्याचा मार्ग आम्हीच दाखवला. मुख्यमंत्री कायदेशीर आहे की नाही हे लवकरच सर्वोच्च न्यायालय ठरवेल. खोके असल्यावर काहीही करता येते. रामाचा, शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे नाते आहे ते कायम राहील असंही राऊतांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा चर्चेत
निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयानंतर श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाणार असून, ही महापूजा केलेला धनुष्यबाण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व तालुक्यात फिरविण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री अयोध्या येथे प्रभू रामाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. ९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री शिंदे अयोध्येत रामाचे दर्शन घेतील. संध्याकाळी शरयू नदीवर आरती होईल. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन ते पुन्हा मुंबईसाठी रवाना होतील.