देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 11:20 AM2024-10-11T11:20:39+5:302024-10-11T11:23:00+5:30

देशाच्या पंतप्रधानांना दोनच कामे आहेत. जेव्हा त्यांना भरपूर वेळ असतो तेव्हा ते विदेशात असतात आणि विदेशात नसतात तेव्हा ते देशात प्रचारात गुंतलेले असतात अशी टीका राऊतांनी मोदींवर केली. 

Uddhav Thackeray MP Sanjay Raut criticizes BJP Amit Shah, Eknath Shinde and Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा

देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई - घटनाबाह्य सरकारचा महायुती जो प्रकार आहे त्यांच्यात कधीही आलबेल नव्हतं. फक्त शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस तोडायची, फोडायची आणि महाराष्ट्र कमजोर करायचा यासाठी हे अघटित सरकार बनवलं गेले. या तिन्ही पक्षांत पहिल्या दिवसांपासून हाणामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कुणीही विचारत नाही असं सांगत शाह आणि शिंदे यांच्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शाहांचा पूर्ण ताबा घेतला आहे. पूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसचे एस के पाटील हे नेते होते. मुंबईतून सगळ्यात जास्त पैसा ते दिल्लीला द्यायचे अशी त्यांची खाती होती. त्या सगळ्यांचा रेकॉर्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडला हे दिसते. त्यामुळे अमित शाह फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्‍यांच्या प्रेमात पडलेले दिसतात. परंतु हे प्रेम नसून अफेअर आहे लक्षात घ्या, ते कधीही तुटू शकते असा दावा राऊतांनी केला आहे.

तसेच सत्ताधारी पक्षच निवडणूक आयोग चालवतो, तेच तारखा ठरवतात. हरयाणासोबत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणं अपेक्षित होते. परंतु सत्ताधाऱ्यांना सोयीचं नसल्याने, त्याशिवाय पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात प्रचाराला वेळ नसल्यामुळे भाजपाच्या सूचनेनुसार या निवडणुका पुढे ढकलल्या असतील. देशाच्या पंतप्रधानांना दोनच कामे आहेत. जेव्हा त्यांना भरपूर वेळ असतो तेव्हा ते विदेशात असतात आणि विदेशात नसतात तेव्हा ते देशात प्रचारात गुंतलेले असतात. २-४ दिवसांत आचारसंहिता लागणार असेल असं सत्ताधारी सांगत असेल तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू. आमची निवडणुकीची तयारी पूर्ण झालीय असा टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला. 

दरम्यान, हे सगळे खादाड सरकार आहेत. ४० टक्के कमिशन खातात, कमिशनबाजीमुळे या लोकांचे आपापसात पटत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांना इतर राज्यातील निवडणुकीचाही खर्च करण्याची जबाबदारी आहे. हरयाणातील भाजपाचा निवडणूक खर्च इथल्या मुख्यमंत्र्‍यांनी केला आहे. किती हजार कोटी इतके पैसे कुठून आले, पुढे इतर राज्यात होणाऱ्या निवडणुकीसाठीही मुख्यमंत्र्‍यांना पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात लूटच लूट सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

Web Title: Uddhav Thackeray MP Sanjay Raut criticizes BJP Amit Shah, Eknath Shinde and Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.