'महाराष्ट्राचा आवाज हरपला!', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 03:52 PM2022-01-17T15:52:09+5:302022-01-17T15:53:16+5:30

N. D. Patil Passed Away : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही 'शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे, महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे', अशा शब्दांत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. 

Uddhav Thackeray, Nana Patole, Ashok Chavan, Devendra Fadnavis pays tribute to Prof N D Patil after his demise | 'महाराष्ट्राचा आवाज हरपला!', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

'महाराष्ट्राचा आवाज हरपला!', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

Next

मुंबई : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे सोमवारी कोल्हापुरातील एका खासगी रूग्णालयात निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. प्रा. एन. डी. पाटील यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही 'शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे, महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे', अशा शब्दांत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. 

मुख्यमंत्री द्धव ठाकरे म्हणाले की, "एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते. सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह होता. महाराष्ट्राच्या विरोधात कोणी 'ब्र' काढलाच तर शिवसेनाप्रमुखांच्या बरोबरीने 'एन. डी.' उभे राहिलेच म्हणून समजा. 

"अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता. एखाद्या वादळासारखे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या लढ्यात उतरत. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे अतोनात नुकसान झाले असून मी त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे अभिवादन करतो," अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. याचबरोबर, प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

सार्वजनिक जीवनातील ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड - अशोक चव्हाण
प्रा. एन.डी. पाटील यांना काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री प्रा. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातील एक ऋषितुल्य, लढवय्ये, लोकाभिमुख व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ते विधीमंडळातील आणि चळवळीतील धडाडती तोफ होते. त्यांच्या रूपात शेतकरी व कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज हरपला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन लोकांसाठी समर्पित राहिले. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. सार्वजनिक संस्थांचा कारभार कसा चालवावा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले होते. आचार, विचार आणि कर्तृत्वाने राजकारणात व समाजकारणात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. त्यांचा जीवनपट व कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहिल. लोकनेते प्रा. एन.डी. पाटील यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, ही प्रार्थना.

दूरदृष्टी लाभलेला नेता हरपला -  देवेंद्र फडणवीस 
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, गेले 7 दशकं अनेक सामाजिक-राजकीय घडामोडींचे साक्षीदार, धडाडीचे कामगार नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खाच्या समयी त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे. शेतकरी-कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी धडाडीने सोडविले. गिरणी कामगारांच्या हक्कासाठी सुद्धा त्यांनी मोठा लढा दिला. सतत नवीन विचारांचा ध्यास ही त्यांची ओळख होती. सुमारे 22-23 वर्ष त्यांनी विधिमंडळ गाजविले. त्यांच्या निधनाने दूरदृष्टी लाभलेला नेता हरपला आहे.

तत्वनिष्ठ व संघर्षशील पर्व संपले - नाना पटोले
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने गरीब, शेतकरी, कष्टकरी, तळागाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणातील एक तत्वनिष्ठ व संघर्षशील पर्व संपले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, आपल्या सात दशकांहून अधिक काळच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत एन. डी. पाटील साहेब कायम शेतकरी, कष्टकरी, तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आणि पुरोगामी विचारांशी प्रामाणिक राहिले. उच्च शिक्षित असलेल्या एन. डी. पाटील साहेबांनी सुरुवातीच्या काळात अध्यापनाचे कार्य केले. शिवाजी विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेत महत्वाची पदे भूषवली. विधानसभा आणि विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी कायमच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सभागृहात अत्यंत आक्रमपणे आवाज उठवून ते सोडवण्याचा प्रयत्न केला. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कासाठी ते अखेरपर्यंत लढत होते. राजकारणासोबतच राज्याच्या सामाजिक चळवळ, शिक्षण, साहित्य आणि सहकार क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य आणि तळागाळातील लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायक आहे. त्यांच्या निधनाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

कष्टकरी,शेतकरी, भुमिहीन, शेतमजुर यांचे लोकनेते हरपले - प्रविण दरेकर
समाजातील कष्टकरी, शेतकरी, भुमिहीन, शेतमजुर, शिक्षणाच्या प्रकाशापासून दूर राहिलेल्यांसाठी व त्यांच्या न्याय हक्कांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे असामान्य व्यक्तिमत्त्व आज हरपले. या शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केले. शेतकरी कामगार पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केले. आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकरी लोकांशी बांधिलकी मानुन काम करणारे ते लोकनेते होते. महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी नाळ जोडून जनआंदोलनांचे नेतृत्व करणारे ते बुलंद नेते आपण गमविल्याचे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी शोक संदेशात नमुद केले आहे. शिक्षण क्षेत्राकरिता त्यांचे कार्य मोठे होते. अनेक आंदोलने व विधायक चळवळींना त्यांनी नेतृत्व प्रदान केले.  राज्य विधान मंडळाचे सदस्य म्हणून दीर्घ काळ काम करणारे प्रा. पाटील आदर्श लोकप्रतिनिधी होते.  त्यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण व राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण मुकलो आहोत या शब्दात दरेकर यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

Web Title: Uddhav Thackeray, Nana Patole, Ashok Chavan, Devendra Fadnavis pays tribute to Prof N D Patil after his demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.