अजमेर शरीफ दर्गा वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:03 IST2024-12-24T18:03:08+5:302024-12-24T18:03:35+5:30
Uddhav Thackeray News: ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा 813 वा उरुस लवकरच सुरू होणार आहे.

अजमेर शरीफ दर्गा वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर
Maharashtra News: राजस्थानमधील जगप्रसिद्ध अजमेर दर्गा शरीफ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या दर्ग्याखाली मंदिर असल्याचा दावा काही संघटनांकडून केला जातोय. दरम्यान, येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा 813 वा उरुस लवकरच सुरू होणार आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (24 डिसेंबर) दर्ग्यावर चढवण्यासाठी चादर पाठवली आहे. ही चादर खादिम सय्यद जिशान चिश्ती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ही चादर सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, मुझफ्फर पावसकर, कमलेश नवले, नौमन पावसकर, उपशाखाप्रमुख गणेश माने आदी उपस्थित होते.
In picture: Shiv Sena chief Uddhav Thackeray sent a chadar to be offered at the 813th Urs of Hazrat Khwaja Moinuddin Chishti's shrine in Ajmer Sharif. Shiv Sena leaders, including Vinayak Raut and Nitin Nandgaonkar, were present to hand it over to Khadim Syed Zishan Chishti. pic.twitter.com/xDOopINKCt
— IANS (@ians_india) December 24, 2024
भाजप मुद्दा बनवणार?
अजमेर दर्ग्याच्या खाली शिवमंदिर असल्याच्या दाव्याबाबत न्यायालयात खटला सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी ही सादर पाठवली आहे. अशा परिस्थितीत ठाकरे यांनी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यासाठी चादर पाठवल्याचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.
पुढील सुनावणी 24 जानेवारीला
राजस्थानच्या अजमेर दर्ग्यामध्ये मंदिर असल्याच्या दाव्यावर शुक्रवारी (20 डिसेंबर) दिवाणी न्यायालयात दुसऱ्यांदा सुनावणी झाली. याचिकाकर्ते आणि इतर पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील निर्णयाची तारीख 24 जानेवारी दिली आहे.
अजमेर दिवाणी न्यायालयाने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, दर्गा समिती अजमेर आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांना नोटीस पाठवली होती. आणखी पाच लोकांनी/संस्थांनी स्वतःला पक्षकार बनवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. यासोबतच दर्गा समितीचे वकील अशोक माथूर यांनी याचिका फेटाळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. तर, विष्णू गुप्ता आणि अंजुमन समितीच्या वकिलांनी आपापल्या बाजू मांडल्या.