मोठा दावा! उद्धव ठाकरेंकडून भाजपाला मैत्रीचा प्रस्ताव; 'इंडिया' आघाडीतील २ पक्ष फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 12:08 PM2023-08-01T12:08:42+5:302023-08-01T12:09:30+5:30

तुम्ही भाजपासोबत जाण्यासाठी इच्छुक आहात का नाही? तुम्ही कुठल्या नेत्यामार्फत भाजपासोबत एकत्र येण्यासाठी प्रस्ताव पाठवता ते नाव सांगावे लागेल असा इशारा भाजपा आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.

Uddhav Thackeray offers friendship to BJP; 2 parties in 'India' alliance will split, Big claim by BJP MLA Nitesh Rane | मोठा दावा! उद्धव ठाकरेंकडून भाजपाला मैत्रीचा प्रस्ताव; 'इंडिया' आघाडीतील २ पक्ष फुटणार?

मोठा दावा! उद्धव ठाकरेंकडून भाजपाला मैत्रीचा प्रस्ताव; 'इंडिया' आघाडीतील २ पक्ष फुटणार?

googlenewsNext

मुंबई – २०१९ ला २५ वर्षाची मैत्री, युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरे नितिमत्ता विसरले. पण शरद पवार, अजित पवार भाजपासोबत आले तर थयथयाट करतायेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जवळचे लोक आजही भाजपासोबत येण्याचा प्रयत्न करत आहे. कुठलीही अट ठेऊ नका, पण आम्हाला सोबत घ्या, दिल्लीत बैठका करण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु भाजपाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही असा दावा भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

आमदार नितेश राणे म्हणाले की, एकदा कुणी बेईमानी केली तर त्याच्यासोबत परत जायचे नाही अशी भाजपाची भूमिका आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला कुणी भीक घालत नाही. पण तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले तर चालते. पण भाजपा अजित पवारांसोबत गेले. शरद पवार नरेंद्र मोदींसोबत गेले तर तुम्ही थयथयाट करता. तुम्ही भाजपासोबत जाण्यासाठी इच्छुक आहात का नाही? तुम्ही कुठल्या नेत्यामार्फत भाजपासोबत एकत्र येण्यासाठी प्रस्ताव पाठवता ते नाव सांगावे लागेल. पाठीमागून प्रस्ताव पाठवायचा आणि माध्यमातून टीका करायची हा उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच सिंचन घोटाळा हा २०१९ च्या आधी झाला आहे. तुम्हीही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. पण २०१९ ला तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत गेला. मग तुम्ही कोणत्या नैतिकतेवर प्रश्न विचारताय. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंची चिंता आहे. माझ्या मुलाचे भविष्य खराब होणार ही भीती असल्याने भाजपासोबत येण्यासाठी ते प्रयत्न करतायेत. मुख्यमंत्री असताना दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत वेगळी बैठक झाली. तेव्हाही प्रस्ताव दिला होता. भ्रष्टाचारात अनेक नेते आत जाणार असल्याने उद्धव ठाकरेंना भीती आहे. सामनातून टीका करायची आणि पाठीमागून मैत्रीचे प्रस्ताव पाठवायचे, हे कबुल करा खोटे बोलाल तर कोणता नेता कुणाला भेटला, कुणी प्रस्ताव दिला हे मी जनतेला सांगून टाकेन असंही आमदार नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष राष्ट्रवादी आमच्यासोबत आला आहे. इंडिया आघाडीची पुढील बैठक महाराष्ट्रात होणार नाही. बीकेसीची सभा शेवटची सभा असल्याचे मी म्हणालो होतो. पुढील काही दिवसांत इंडिया आघाडीतील २ प्रमुख पक्ष एनडीएसोबत येतील. येणाऱ्या दिवसांत त्याचे उत्तर तुम्हाला मिळेल असा दावाही आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

Web Title: Uddhav Thackeray offers friendship to BJP; 2 parties in 'India' alliance will split, Big claim by BJP MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.