उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मार्गदर्शक

By admin | Published: May 1, 2016 01:32 AM2016-05-01T01:32:46+5:302016-05-01T01:32:46+5:30

उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत, ते आम्हाला उत्तम मार्गदर्शन करतात, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली

Uddhav Thackeray Our Government's Guide | उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मार्गदर्शक

उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मार्गदर्शक

Next

मुंबई : उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत, ते आम्हाला उत्तम मार्गदर्शन करतात, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. गोरेगाव पूर्व व पश्चिम मार्गांना जोडणाऱ्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्या वेळेस ते बोलत होते.
या उड्डाणपुलाच्या नावासह विविध विषयांवर राज्यात, केंद्रात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत एकत्र असलेल्या सेना-भाजपामध्ये कलगीतुरा रंगला होता. त्याचप्रमाणे दुष्काळ, कन्हैयाकुमार आणि स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवरून भाजपावर कडाडून टीका करणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या समारंभात काय बोलतात, आणि फडणवीस त्याला काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
मात्र दोघांनी युतीतील वादाबाबत बोलण्याचे टाळले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मृणालतार्इंचे आणि युती सरकारचे विचार जरी एकमेकांना पटत नसले तरी त्यांची त्यांच्या कामावरील निष्ठा, न्यायवृत्ती याला आमचा सलाम आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पुलाला मृणालतार्इंचे नाव शिवसेनेने सुचविले म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र आम्ही जन्माला येण्याच्या आधीपासून त्या समाजकारणात कार्यरत होत्या. पाण्याचा प्रश्न सोडविल्यानंतर ‘पाणीवाली बाई’ ही उपाधी त्यांना जनतेतून मिळाली होती, तसेच लोक मानत नाहीत म्हणून पक्षबदल करून त्यांनी कधीच पक्ष व विचारांशी गद्दारी केली नाही. त्यामुळे गोरेगावच्या या पुलाला मृणालतार्इंचे नाव देणे योग्यच होते.
या वेळी मृणालतार्इंच्या कन्या अंजली वर्तक, राज्यमंत्री विद्या ठाकूर यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाला खा. गोपाळ शेट्टी, गजानन कीर्तिकर, सुनील प्रभू, आ. कपिल पाटील, आयुक्त अजय मेहता, उपमहापौर अलका केरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Uddhav Thackeray Our Government's Guide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.