निकालानंतर ठाकरे गटाचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा; छत्रपती संभाजीनगरात करणार आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 10:22 AM2024-12-02T10:22:35+5:302024-12-02T10:26:34+5:30
या आंदोलनाला समस्त हिंदू बांधवांनी व शिवसैनिकांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन दानवेंनी केले.
छत्रपती संभाजीनगर - मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली तेव्हापासून विरोधकांकडून सातत्याने ठाकरे गटावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जात होता. लोकसभा निकालातही अनेक मुस्लिम बहुल भागातून ठाकरे गटाला भरभरून मतदान झालं होते, त्याचाच आधार घेत भाजपासह इतर विरोधकांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाने पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिला आहे. बांगलादेशातहिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ठाकरे गट छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलन करणार आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात हे आंदोलन होणार आहे. याबाबत दानवेंनी ट्विट करून सांगितले की, बांगलादेशमधीलहिंदूंवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ आणि हे अन्याय अत्याचार गप्प राहून बघणाऱ्या मोदी सरकारच्या निषेधार्थ भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला समस्त हिंदू बांधवांनी व शिवसैनिकांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केले.
https://t.co/5klJToeDO5pic.twitter.com/5UtFdMh4WI
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 2, 2024
बांगलादेशात काय घडतंय ?
बांगलादेशात इस्कॉनचे मुख्य पुजारी चिन्मय प्रभू यांच्या अटकेनंतर अनेक हिंदू संघटनांशी निगडित लोकांवर कारवाई केली जात आहे. बांगलादेशातून हजारो इस्कॉन सदस्यांना भारतात यायचं आहे परंतु सर्व कागदपत्रे असतानाही सीमेवर बांगलादेशी पोलिसांनी त्यांना रोखले आहे. बांगलादेशातून शेख हसीना यांचे सरकार उलथल्यापासून सातत्याने तेथील अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. भारतातून पर्यटनासाठी गेलेल्या एका व्यक्तीने त्याला आलेला अनुभव सांगितला. ते एकेठिकाणी गेले असता तिथे जमावाला मी हिंदू असल्याचं कळलं तेव्हा त्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. यातून जीव वाचवून ते पळाले. अनेक हिंदू वस्त्यांवर हल्ल्याच्या घटना येत आहेत. मागील काही काळापासून बांगलादेशात हिंदू मंदिरे तोडली जात आहेत. त्याठिकाणी राहणाऱ्या हिंदू कुटुंबाचा छळ केला जात आहे. मुस्लीम कट्टरतावादी लोकांकडून हिंदूना टार्गेट करण्यात येत आहे.