Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 01:28 PM2023-04-11T13:28:38+5:302023-04-11T13:29:25+5:30

भाजपा शिवसेनेवर अन्याय करत आहे, तो पहावला जात नाहीय म्हणून राजीनामा देणार आहे, असे नाटक मिंध्यांनी कल्याणमध्ये केले होते, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली.

Uddhav Thackeray PC: BJP's Chandrakant Patil should resign, otherwise...; Uddhav Thackeray's warning to Eknath Shinde on babri masjid shivsena | Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

googlenewsNext

बाबरी पाडण्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांचा सहभाग होता, शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नव्हता असे वक्तव्य भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे. विषय गंभीर असून काल चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले आहेत, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते, असे प्रत्यूत्तर ठाकरे यांनी दिले आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी असा दावा केला, "६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल नेहमीच बोलत असतात, पण मनात खरचं प्रश्न पडतो की ते त्यावेळी अयोध्येतही होते का?" असा सवाल केला होता. 

यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा मिंधे जे तिथे बसले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा नकोच पाटलांची हकालपट्टी करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.  

भाजपा शिवसेनेवर अन्याय करत आहे, तो पहावला जात नाहीय म्हणून राजीनामा देणार आहे, असे नाटक मिंध्यांनी कल्याणमध्ये केले होते. हेच लोक जर भाजपासोबत राहणार असतील तर त्यांनी शिवसेनेचे नाव घ्यायचे नाही, बाळासाहेबांचा फोटो लावायचा नाही, नाहीतर त्यांनी थेट राजीनामा द्यावा, असे आव्हान ठाकरे यांनी शिंदे यांना दिले आहे. 

राम मंदिरातचा निकाल कोर्टाने दिला, त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये. हे उंदीर आता बिळातून बाहेर पडत आहेत. स्वत: अडवाणी म्हणाले होते, बाबरी पाडणारे लोक मराठी बोलत होते, ते कोणाचे ऐकायला तयार नव्हते आणि आता पाटील म्हणतात की शिवसेना नव्हती. बाळासाहेबांनी देखील आम्हीच बाबरी पाडल्याचे म्हटले होते, असे प्रत्यूत्तर ठाकरे यांनी दिले आहे. 

बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाही. पाटील बोलले आहेत. श्रेयवादाचा प्रश्नच नाही. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. ही भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसत ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाहीए म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. यांचे गोमूत्र धारी हिंदुत्व. हिंदुत्वाचा बुरखा घातलाय त्यात आत अत्यंत विकृत चेहरा त्यांचा आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत ? की स्वतः च स्वतःला जोडे मारणार आहेत? असा सवालही ठाकरे यांनी केला.

Web Title: Uddhav Thackeray PC: BJP's Chandrakant Patil should resign, otherwise...; Uddhav Thackeray's warning to Eknath Shinde on babri masjid shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.