Uddhav Thackeray PC: हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही; पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला खडसावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 02:19 PM2022-07-01T14:19:37+5:302022-07-01T14:20:02+5:30
ज्याप्रकारे हे सरकार स्थापन झाले. तथाकथित मुख्यमंत्री केला. हेच मी अडीच वर्षापूर्वी सांगत होतो असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
मुंबई - सत्ता येते-जाते परत येते, परंतु लोकांच्या अश्रूची प्रतारणा केली नाही. विचित्रपणाने शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्रिपदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होणं हे जनतेला आवडेल न आवडेल माहिती नाही परंतु हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. तो धृतराष्ट्रासारखा नाही. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याप्रकारे हे सरकार स्थापन झाले. तथाकथित मुख्यमंत्री केला. हेच मी अडीच वर्षापूर्वी सांगत होतो. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा काळ वाटून घ्यावा हेच अमित शाहांशी बोलणं झाले होते. मग त्यावेळेला नकार देऊन आत्ताच हे का घडलं? लोकसभेला, विधानसभेला आपण एकत्र होतो. आधीच हे घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता असं त्यांनी सांगितले.
लोकशाही धोक्यात
लोकशाहीचे चार स्तंभ असतात, या चारही स्तंभाने लोकशाही वाचवायला पुढे यायला पाहिजे. लोकशाही उरली नाही तर या स्तंभाला काहीही अर्थ राहणार नाही. आपल्याकडे गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे. ज्याने मतदान केले त्याला कळायला हवं कुणाला मतदान हवं. आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली. निवडून आलेल्या प्रतिनिधीला बोलावण्याचा अधिकार हवा असं बाळासाहेब म्हणाले होते. माहिमच्या मतदाराने टाकलेले मत व्हाया सूरत, व्हाया गुवाहाटी गोवा फिरत असेल तर लोकशाही आहे कुठे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मातोश्रीत दिलेला शब्द पाळला असता तर...
लोकशाहीत सर्वोच्च मतदार असतो. त्याचा बाजार अशाप्रकारे मांडलेला असतो ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे. मातोश्रीत दिलेला शब्द पाळला असता तर आत्ताचे सरकार शानदारपणे झाले असते. माझ्या पाठित सुरा खुपसला तो मुंबईकरांच्या पाठित खुपसू नका. मला दिलेला शब्द पाळला असता तर अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता, यात भाजपाच्या मतदारांना काय मिळालं हे कळत नाही असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.
माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका
तसेच माझ्यावर राग आहे, पण त्याचा राग मुंबईवर काढू नका. एका रात्रीत आरेतील कारशेडबाबत निर्णय बदलण्यात आला. मी विकासाच्या आड येत नाही. मी पर्यावरणवादीच्या सोबत आहे. संभ्रम होतो ती गोष्ट टाळलेली बरी. माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. अहंकार नाही. आरेचा आग्रह रेटू नका. जेणेकरून मुंबईच्या पर्यावरणाला हानी पोहचेल, आज आरेचा भाग घेतल्यानंतर त्याच्या आजूबाजूला खासगी विकासक येतील, वन्यजीव धोक्यात येईल, कांजूरची जमीन महाराष्ट्राच्या हितासाठी वापरा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.