शिंदेंना बाजूला करून युतीसाठी ठाकरे तयार होते; दीपक केसरकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 05:36 AM2022-08-06T05:36:38+5:302022-08-06T05:37:09+5:30
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे यांची नाहक बदनामी झाली. हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकनाथ शिंदे यांना बाजूला करत असाल तर मी भाजपशी युती करायला तयार आहे, असा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिला होता; पण तो आम्ही आणि भाजपनेही मान्य केला नाही, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत केला.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे यांची नाहक बदनामी झाली. हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला होता. परस्परसंबंध जपण्यासाठी ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचीही तयारी दर्शविली होती; मात्र त्यानंतर बराच वेळ गेल्याने ते शक्य झाले नाही, असेही ते म्हणाले.
ठाकरे यांनी पदापेक्षा मोदी यांच्याशी असलेले संबंध जपण्याला प्राधान्य देण्याचे ठरवले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी पदत्यागाची तयारी ठेवली होती. मात्र, नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला, त्यातच राणे पितापुत्राने आदित्य ठाकरे यांची सुशांतसिंग प्रकरणात भाजपच्या कार्यालयात पत्रपरिषद घेऊन बदनामी केली; त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले आणि संवाद थांबला. दुसरीकडे भाजपच्या १२ आमदारांना ठाकरे सरकारने एक वर्षासाठी निलंबित केल्याने भाजपचीही तीव्र नाराजी झाली आणि पुढचे सगळे थांबले, असा दावा केसरकर यांनी केला.