“सामान्य वाऱ्यावर, घरात काम करणाऱ्यांना वाय-झेड प्लस”; पार्थ पवार सुरक्षेवर ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 03:50 PM2024-04-24T15:50:19+5:302024-04-24T15:50:29+5:30
Uddhav Thackeray Press Conference News: महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी हेच एक यावर उत्तर आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
Uddhav Thackeray Press Conference News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे तीव्र होताना दिसत आहेत. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावरून महाविकास आघाडीचे नेते महायुतीच्या सरकारवर टीका करत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यावरून खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पार्थ पवार यांच्या सुरक्षेवरून कानपिचक्या दिल्या. मला समजले की, रॉकेट, रणगाडे वगैरे वगैरे… काय काय त्यांना देत आहेत. आता घरात काम करणाऱ्यांना पण वाय प्लस, झेड प्लस दर्जाची सुरक्षा देत आहेत. सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार होत आहे आणि इकडे गद्दारांची सुरक्षा केली जात आहे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.
अशोक चव्हाण भाजपात गेले अन् काँग्रेसमध्ये नवचैतन्य आले
अशोक चव्हाण भाजपात गेल्यापासून काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, असा टोला लगावत, राज्यात महाविकास आघाडीचे ४८ खासदार निवडून येतील, असे वाटत आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. तसेच सुरतमध्ये एक जादू झाली आणि भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. अशा प्रकारची जादू आता होऊ लागली तर सर्वसामान्य लोक काय शिल्लख राहणार. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी हेच एक यावर उत्तर आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.