राज ठाकरेंसोबत पुन्हा मैत्री करणार का? खुद्द उद्धव ठाकरे म्हणाले, “मी असं मानतो की...”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 05:21 PM2023-07-09T17:21:02+5:302023-07-09T17:22:42+5:30
Uddhav Thackeray And Raj Thackeray: ठाकरे बंधुंनी आता एकत्र यायला हवे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना खुद्द उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
Uddhav Thackeray And Raj Thackeray: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असा सूर राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. या दोन्ही भावांनी एकत्रित यावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. यातच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी याबाबत भाष्य केले होते. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी सहभाग घेतला. बाळासाहेबांचे माझ्यावर आणि माझे बाळासाहेबांवर खूप प्रेम होते. बाळासाहेब त्यांच्या अखेरच्या दिवसांत होते, तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होतो. त्यावेळेस त्यांनी सर्वांना बाहेर जायला सांगितले आणि मला एकट्यात शेवटची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी मला राज आणि उद्धव यांना एकत्र करण्यास सांगितले. राजकारण एका बाजुला, पण एक कुटुंब म्हणून एकत्र असल्यावर ताकत वाढत असते. बाळासाहेबांची ती इच्छा अद्याप अपूर्ण राहिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाची जबाबदारी बाळासाहेबांनी माझ्यावर दिली होती. मी त्यासाठी प्रयत्नही केले. परंतु, यश आले नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. यावर मीडियाशी बोलताना उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी असे मानतो की...”
विदर्भाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी यावर बोलताना सांगितले की, तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका. मात्र, मी असे मानतो की, बाळासाहेबांचा पुत्र म्हणून मीही बाळासाहेबांच्या जवळच होतो. त्यामुळे मला असे वाटत नाही की, मला न सांगता बाळासाहेब आणखी कुणाशी काही बोलले असतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, भाजप आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाहीये. भाजपने आता कोणावरही दोषारोप करण्याचे सोडून द्यावे. आता त्यांनी त्यांच्या घरात घुसलेल्या बाजार बुंडग्यांचा सांभाळ करावा. दुसऱ्यांवर टीका करत बसू नये, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.