Narayan Rane: जूनच्या वादळात उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जाणार; नारायण राणेंची पुन्हा भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 08:01 PM2022-04-19T20:01:31+5:302022-04-19T20:03:08+5:30
Narayan Rane on CM Uddhav Thackeray: नारायण राणे यांनी आज वाशिममध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊतबद्दल प्रश्न विचारु नका असे म्हणत राऊतांवर टीका केली.
महाराष्ट्रात तीन पक्षांचे ठाकरे सरकार अस्तित्वात येत नाही तोच भाजपाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंचे सरकार आज जाणार, उद्या पडणार असे अनेकदा सांगितले जात होते. आजही दररोज नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री, नेते, मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर कारवाई करत आहे, अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा भविष्यवाणी केली आहे.
नारायण राणे यांनी आज वाशिममध्ये पत्रकार परिषद घेतली. आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळे येतात. या वादळांत डुलणारी झाले फांद्यांसकट मोडून पडतात. राज्यातही तीन पक्षांचे एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री बसले आहेत. ते खोडावर नाही बसलेत, यामुळे जूनपूर्वीच ते मुख्यमंत्री पदावरून बाजुला होतील, असे वक्तव्य राणे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री मंत्रालयात बसत नाहीत. कॅबिनेट बैठकीला जात नाहीत. अधिवेशनात किती मिनिटं जातात? एकेदिवशी तर कॅबिनेटला तीन मिनिटांसाठी आले होते. अधिवेशनात अंतिम आठवड्यात उत्तर दिले. कलानगरच्या नाक्यावरचं भाषण विधीमंडळात केल्याची टीका राणे यांनी केली. यानंतर संजय राऊतांवर प्रश्न विचारला असता, संजय राऊतबद्दल प्रश्न विचारु नका असे म्हणत राऊतांवर टीका केली. काळ्या पैशाने घेतलेली संपत्ती ईडीने जप्त केली. त्या माणसाला लोकांना शहाणपणा सांगण्याची नैतिकता नाही. संपादकाला किती पगार असतो? तुम्ही पत्रकार आहात. तुम्ही रायगड समुद्रकिनारी प्लॉट घेऊ शकता का? नाहीतर व्हा सगळे संपादक, अशा शब्दांत राऊतांचा समाचार घेतला.
नारायण राणे यांनी याआधी असे अनेकदा तारखा जाहीर केल्या आहेत. पण अद्यापही महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हे सरकार आपल्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे वारंवार सांगण्यात आले आहे. राऊत तर आणखी २५ वर्षे भाजपाला सत्तेत येण्याची संधी नाही असे म्हणत आहेत.
राऊतांचे प्रत्यूत्तर
गेली ५० वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेसाठी वादळं नवीन नाहीत. वादळं परतून लावण्याची आणि नवीन वादळं निर्माण करण्याची क्षमता फक्त राज्यात शिवसेनेतच आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी नारायण राणेंच्या या भविष्यवाणीवर दिले आहे.