Uddhav Thackeray Interview: बाहेर इतकं वादळ माजलंय तरीही इतके ‘रिलॅक्स’ कसे? उद्धव ठाकरेंनी सांगितलं सिक्रेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 08:40 AM2022-07-26T08:40:01+5:302022-07-26T08:40:01+5:30
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आलेले हे रसायन असून, मला माझी आणि शिवसेनेची बिलकूल चिंता नाही.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यातच ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. पक्षातील अभूतपूर्व बंडाळीनंतर आता पक्ष वाचवण्याचे सर्वांत मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे. शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोड पण भाष्य केले.
बाहेर इतकं वादळ माजलंय तरीही तुम्ही इतके ‘रिलॅक्स’ दिसताय, याचे रहस्य काय असा सवाल संजय राऊत यांनी केला. यावर हसतमुखपणे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे रहस्य फार गुंतागुंतीचे नाही. तुम्ही जाणता, माझी माँ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आलेले हे रसायन आहे. माँ म्हटल्यानंतर शांत, सौम्य, संयम आणि साहजिकच आहे, बाळासाहेब म्हटले तर वर्णन करण्याची आवश्यकताच नाही. बाळासाहेब काय होते हे महाराष्ट्रच नव्हे तर अवघा देश जाणतो. थोडेफार ते रसायन आलेय माझ्यात, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राजकीय संकट घोंघावताना दिसतेय, पण शांत आहे
एक वादळ आल्याचा आभास होतोय. तुम्ही लक्षात घ्या, वादळ म्हटले की पालापाचोळा उडतो. तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरे दृश्य लोकांसमोर नक्कीच येणार आहे. खरे सांगायचे तर मला चिंता नाहीये. चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकूल नाहीये. मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंटय़ांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे. म्हणून मी जे म्हटलं की, हा पालापाचोळा सध्या उडतोय, तो उडू द्या. इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पाने उडतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आपण माझी मुलाखत घेतली होती तेव्हा कोरोनाचा कहर होता. त्या कोरोनामध्ये जे काही करता येणे शक्य होते, ते मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि अभिमानाने सांगेन की, राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून मी केले. त्यावेळी लॉकडाऊन होते, मंदिरे बंद होती, सणासुदींना बंदी होती. पण या वर्षी आपण पहिल्यांदाच पंढरपूरच्या वारीत कोणतेही अडथळे येऊ दिले नाहीत आणि जल्लोषात ती पार पाडली. म्हणजेच पुन्हा एकदा सणासुदीला सुरुवात झाली आहे. आता दहीहंडी येईल, गणपती येतील, नवरात्र येईल, दिवाळी येईल. पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात उत्सव, उत्साह आणि आनंद याची सुरुवात झाली आहे. मध्यंतरी जणुकाही एक ‘पॉज’ बटण दाबले गेले होते. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण कोरोनातून आणि त्या संकटातून बाहेर पडलो. मला आनंद आहे, असेही त्यांनी सांगितले.