Uddhav Thackeray Malegaon Sabha: ‘मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगाव’; उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी ऊर्दूतील बॅनरची जोरदार चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 11:09 AM2023-03-26T11:09:44+5:302023-03-26T11:11:05+5:30
Uddhav Thackeray Malegaon Sabha: खेड येथील सभेनंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे सभा होत आहे.
Uddhav Thackeray Malegaon Sabha: खेड येथील सभेनंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे सभा होत आहे. खेडमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली होती. यानंतर आता मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत मालेगाव दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेला एक लाख जणांची उपस्थितीत असेल, असा मोठा दावा करण्यात आला आहे. मात्र, तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी लावण्यात आलेल्या ऊर्दू भाषेतील बॅनरची जोरदार चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्याही नेत्याच्या सभेवेळी, सभा परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जाते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी ऊर्दू भाषेत लावण्यात आलेल्या बॅनरनी विशेष लक्ष वेधले असून, या बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या सभेला जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे, यासाठी विशेष प्रयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुस्लिम बहुल भागांमध्ये अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर लावले असून उर्दू भाषेतून या सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये उर्दूवर काही बंदी आहे का?
या बॅनरचे संजय राऊत यांनी समर्थन केले असून, महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये उर्दूवर काही बंदी आहे का? अनेक लेखक, अनेक अभ्यासक साहित्यिक त्यांनी उर्दूमध्ये लिखाण केलेल आहे. आणि त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त या सभेला यावे, यासाठी ठाकरे गटाकडून हे प्रयोजन केल्याचं संजय राऊत यांनी म्हटले आहे. यातील काही बॅनरवर ‘मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगाव’, लिहिले असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून दादा भुसे हे निवडून आले आहेत. सध्या ते नाशिकचे पालकमंत्री असून, मंत्रिपदाचा कार्यभार ते सांभाळत आहेत. शिवसेना फुटल्यानंतर ते बाहेर पडले. अशातच मालेगावमधून भाजपचे अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत भाजपसह शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का दिला. याच पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यासह परिसरात शिवसेना ठाकरे गट संपर्क वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा असल्याचे सांगितले जात आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"