Uddhav Thackeray Interview: “होय, आदित्यच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी उसळतेय; महाराष्ट्रात शिवसेनेचं तुफान पुन्हा येईल!”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 09:30 AM2022-07-27T09:30:00+5:302022-07-27T09:30:00+5:30
Uddhav Thackeray Interview: मग मी बाहेर पडेन. सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. अख्ख्या राज्याचा दौरा होईल. वादळ निर्माण करू, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला.
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठेच भगदाड पडले आहे. पक्ष वाचवण्याचे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असल्याचे सांगितले जात आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही आता कंबर कसली आहे. ठाकरे पिता-पुत्र ऑगस्टमध्ये राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात असून, शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसत आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोडपणे भाष्य केले.
पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का, या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, का नाही होणार? आणि तो जर करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी तर शिवसेनेचाच आहे. मी पक्षप्रमुख आहे. पण माझा हेतू तो नव्हता. मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन? शिवसेना मला वाढवायची आहे… आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेन तर मी कशाला पक्षप्रमुख, असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरेंनी केला.
आदित्यचे दौरे आपण बघताय
राज्यातले वातावरण आज ढवळून निघतेय. आज आदित्यचे दौरे आपण बघताय. प्रचंड गर्दी उसळते आहे. सगळीकडे हीच चर्चा आहे की विश्वासघातक्यांना धडा शिकवायचा, असा निर्धार व्यक्त करताना, मी साधारणतः ऑगस्टमध्ये बाहेर पडणार. ह्याचं कारण असं की, गेल्याच आठवडय़ात जिल्हाप्रमुखांना काही सूचना दिल्यात, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, त्याच्यानंतर सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी. हे मोठय़ा प्रमाणात आता सुरू आहे. आता आदित्य फिरतोय. एका एका टप्प्याने जातोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी राज्यात फिरायला लागेन तेव्हा त्यात या लोकांना येण्यासाठी ही कामं सोडावी लागतील म्हणून मी तेवढय़ासाठी थांबलोय. एकदा ही नोंदणीची कामं होऊ द्या. मग मी बाहेर पडेन. सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. अख्ख्या राज्याचा दौरा होईल. राज्यात वादळ निर्माण करू, असा एल्गार उद्धव ठाकरेंनी केला.
दरम्यान, शिवसेनेचं तुफान आहेच. लोकांच्या मनात, हृदयात आजही तुफान आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं तुफान पुन्हा येईल! ‘वर्षा’ सोडून ‘मातोश्री’वर निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या डोळय़ात जे पाणी होते त्या अश्रूंचे मोल मला आहे. त्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लावल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही, गप्प बसू नका ही माझी जनताजनार्दनाकडे प्रार्थना आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.