'प्राधान्य गटाचे लसीकरण चार महिन्यांत पूर्ण करा', राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 04:58 AM2021-03-19T04:58:05+5:302021-03-19T06:40:50+5:30
विभागीय आयुक्तांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे लसीकरणसंदर्भात बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई : येत्या तीन ते चार महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांना दोन डोस द्यायचेच आहेत हे सांगताना उन्हाळा लक्षात घेऊन सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व उन्हापासून संरक्षण होईल अशी व्यवस्था उभारावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
विभागीय आयुक्तांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे लसीकरणसंदर्भात बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना काल केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिली असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात दर दिवशी येणाऱ्या रुग्णांपेक्षा आज रोजीची संख्या उच्चांकी असून राज्यातील जिल्हा प्रशासनाने अतिशय वेगाने रुग्ण आणि त्यांचे संपर्क शोधणे, निर्बंधांचे आणि आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. कोरोना लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची बाब समाधानकारक आहे. मात्र, दर दिवशी ३ लाख लस दिली पाहिजे यादृष्टीने नियोजन करण्याचे त्यांनी आरोग्य विभागास सांगितले.
लसीकरणात आजच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र संपूर्ण देशात जवळजवळ अव्वलस्थानी आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. आत्तापर्यंत दोन्ही मिळून ३६ लाख ३४२४ डोस देण्यात आले असून केवळ राजस्थान ३६ लाख ८४ हजार डोस देऊन महाराष्ट्रापेक्षा किंचित पुढे आहे, असे दैनंदिन लसीकरण अहवालावरून दिसते.
राज्यात बहुतांश ठिकाणी तीव्र उन्हाळा असतो, त्याचा परिणाम कमी लसीकरणावर होऊ शकतो हे गृहीत धरून नागरिकांना दुपारच्या आत किंवा दुपारनंतर व उशिरा रात्रीपर्यंत लस देण्याची व्यवस्था करावी तसेच ज्येष्ठ व सहव्याधी रुग्ण रांगांमध्ये उभे असतात त्यांची गैरसोय होणार नाही व कुठेही वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात एकवेळ होती जेव्हा दिवसाला केवळ २ हजार रुग्ण येत होते. आता गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे , त्यादृष्टीने परत एकदा तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपात वैद्यकीय कर्मचारी व सहायक नियुक्त करा तसेच बेड्सची जादा संख्या कशी उपलब्ध राहील याचे नियोजन करावे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
सहा टक्के लस जात आहे वाया -
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात इतर काही राज्यांच्या तुलनेत लस विविध कारणांमुळे वाया जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. काही राज्यांत २० टक्क्यांपर्यंत लस वाया जाते. मात्र, महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ ६ टक्के आहे, ते देखील शून्यावर आले पाहिजे.