देवेंद्र फडणवीस माझ्या पक्षात नाहीत याचा पश्चात्ताप होतो: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 10:12 PM2018-09-08T22:12:14+5:302018-09-08T22:14:49+5:30
मुंबई: भाजपसोबतच्या युतीत शिवसेना सडली, असं जाहीर सभेत म्हणणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. फडणवीस माझ्या पक्षात नाहीत याबद्दल पश्चाताप होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
भाजपला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्यावर मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू होताच मी लगेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिला होता, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. यावर त्या निर्णयाचा पश्चाताप होतो का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्या प्रश्नाला व्यक्ती म्हणून कधीच त्या निर्णयाचा पश्चाताप होत नाही. मात्र पक्ष म्हणून नक्कीच याबद्दल पश्चाताप होतो. कारण देवेंद्र फडणवीस माझ्या पक्षात नाही, असं उत्तर उद्धव यांनी दिले. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत. एक व्यक्ती म्हणून मी कायम त्यांच्यासोबत असेन. राजकारणामुळे आमच्या मैत्रीत कधीही दुरावा येणार नाही, असंही यावेळी उद्धव यांनी म्हटलं.