मुंबईतून बॉलीवुड संपवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 11:27 PM2020-10-15T23:27:14+5:302020-10-15T23:31:03+5:30
राज्यातील सिनेमागृहे सुरू करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन यासाठी एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केली आहेत. एसओपी निश्चित झाल्यानंतर सिनेमागृहे सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (CM Uddhav Thackeray)
मुंबई - 'मुंबईतून बॉलीवूडला संपवण्याचे अथवा इतरत्र हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. सध्या बॉलीवूडला एका विशिष्ट वर्गाकडून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे वेदना दायक आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधला. यावेळी मुंबईचे महत्व सांगताना ठाकरे म्हणाले, 'मुंबई ही महाराष्ट्राची केवळ आर्थिक राजधानीच नाही, तर सांस्कृतिक राजधानीही आहे. आज बॉलीवुडमध्येही हॉलीवुड सिनेमांस तोडीस तोड चित्रपट तयाह होत आहेत. संपूर्ण जगभरात बॉलीवुड सिनेमांचा चाहतावर्ग आहे. हे क्षेत्र, अनेकांना रोजगार देते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही लोक या क्षेत्राची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबईतून बॉलीवुड संपवण्याचा अथवा इतरत्र हलविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे सहन केले जाणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
यावेळी, राज्यातील सिनेमागृहे सुरू करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन यासाठी एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केली आहेत. एसओपी निश्चित झाल्यानंतर सिनेमागृहे सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सिनेमागृहे गेल्या 6 महिन्यांहून अधिक काळ बंद आहेत. याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वन दिले.
राज्यातील सर्व ग्रंथालये, मेट्रो सेवा सुरू -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये आजपासून राज्यातील सर्व ग्रंथालये आणि टप्प्याटप्प्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच, कंटेन्मेंट झोन बाहेरील आठवडी बाजारसुद्धा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.