राष्ट्रीय स्तरावर महाआघाडीचा प्रयोग झाल्यास काय करणार उद्धव ठाकरे म्हणतात…
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 10:39 AM2020-02-05T10:39:51+5:302020-02-05T10:43:50+5:30
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर असा प्रयोग झाल्यास शिवसेनेची काय भूमिका असेल याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपाची असलेले संबंध तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली होती. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर असा प्रयोग झाल्यास शिवसेनेची काय भूमिका असेल याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
महाविकास आघाडीच्या प्रयोगालाआता सुरुवात राज्यात तर झालेली आहे. देशाने त्यातून काही धडा घेतलाय… न घेतलाय… आपल्याला कळलं पाहिजे. ते कळत नाही तोपर्यंत बोलण्यात काय अर्थ आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीच्या शेवटच्या भागात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीबाबत भाष्य केले आहे.
‘’हा महाराष्ट्र देशाला नवीन दिशा दाखवत आला आहे. म्हणूनच मी तीन पक्षांच्या सरकारच्या नेतृत्वाची धुरा एक आव्हान म्हणून स्वीकारलेली आहे. प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की, महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. त्या महाराष्ट्रात जन्माला आलेले आपण लोक इतिहासामध्ये रमण्याच्या बरोबरीने इतिहास घडवण्याच्या मागे लागले पाहिजे. सगळय़ांनी सहकार्य केलं तर आपलं राज्य हे देशाला नवी दिशा दाखवेल.’’असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
'सरकारचा 'रिमोट कंट्रोल' नेमका कुणाकडे?', उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट
पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा
दरम्यान, शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत, ‘रिमोट कंट्रोल’ नाहीत, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांना सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ दुसऱ्या कोणाकडे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला त्याला त्यांनी उत्तर दिलं आहे. 'रिमोट कंट्रोल वगैरे असा काही प्रश्न नाहीये. आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. आणि हो, तुमच्या प्रश्नाचा रोख मला कळला… तुम्हाला शरद पवारांविषयी विचारायचं आहे का? तर शरद पवारसुद्धा रिमोट कंट्रोल म्हणून वागत नाहीत… त्यांच्या काही सूचना असतील तर त्या जरूर करतात' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.