उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील, माजी मंत्र्याच्या दाव्यामुळे खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:12 IST2025-01-22T09:10:21+5:302025-01-22T09:12:44+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? हे सांगता येत नाही. अशातच आता राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी (दि.२१) मोठा दावा केला आहे.

Uddhav Thackeray-Sharad Pawar will soon be seen with Modi at the Center, former minister's Bachu Kadu statement creates a stir! | उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील, माजी मंत्र्याच्या दाव्यामुळे खळबळ!

उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील, माजी मंत्र्याच्या दाव्यामुळे खळबळ!

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राजकीय समीकरणे बदललेली पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? हे सांगता येत नाही. अशातच आता राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी (दि.२१) मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे, ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या  या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः महाविकास आघाडीत कोणता भूकंप होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

पुढे बच्चू कडू म्हणाले की, ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन विधेयक पास करण्यासाठी भाजपासोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजपा बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना यांचा प्रामुख्याने विचार आहे. कारण, या दोन्ही पक्षाकडील खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये, हाच राऊत यांचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. 

बच्चू कडू यांनी भाजपवर सुद्धा जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपासाठी संपलेली असून, भाजपाची मोघलाई निती आहे. त्यामुळे जो त्यांच्यापासून लांब जातो त्यांना ते कापून टाकतात हीच भाजपाची निती आहे, असे म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 

राज्यात आलेले सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्याने येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजी बाबत बोलताना जेव्हा मोठे नेते नाराज असतात तेव्हा समजायचे की ते अति खूश असतात आणि जेव्हा ते अति खूश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात असा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे.

Web Title: Uddhav Thackeray-Sharad Pawar will soon be seen with Modi at the Center, former minister's Bachu Kadu statement creates a stir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.