Uddhav Thackeray: "आपला धनुष्यबाण हिसकावण्याचा प्रयत्न होणार, शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी तयार राहा’’, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 09:10 AM2022-07-08T09:10:57+5:302022-07-08T09:23:37+5:30
Uddhav Thackeray: शिंदे गट शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गटामध्ये कायदेशीर लढाई होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भविष्यातील वाटचालीबाबत सूचक आवाहन केलं आहे.
मुंबई - गेल्या महिन्यात राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ४० हून अधिक आमदारांनी बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाने आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटाला आमदारांनंतर अनेक खासदारांचा पाठिंबाही मिळण्याची शक्यता आहे. आता शिंदे गट शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गटामध्ये कायदेशीर लढाई होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भविष्यातील वाटचालीबाबत सूचक आवाहन केलं आहे. कायदेशीर लढाईमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागल्यास नव्या चिन्हासाठी तयार राहा आणि ते घरोघरी पोहोचवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. तसेच आता पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, कायदेशीर लढाईमध्ये शिवसेनेची ओळख असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागू शकते, अशी चिंता उद्धव ठाकरे यांना सतावत आहे. त्या पार्श्वभूमीवर विश्वसनीय सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह केलेलं बंड आणि त्या प्रक्रियेला न्यायालयीन पातळीवर मिळालेली साथ विचारात घेता आता शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हही काढून घेण्याचा प्रयत्न होईल. आपण कायद्याने जो लढा द्यायचा तो देऊ, मात्र दुर्दैवाने या कायदेशीर लढाईत अपयश आलं तर गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवं चिन्ह मिळेल. ते कमी कालावधीत घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंसह १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर ११ जुलै रोजी सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत विधानसभेत बहुमत सिद्ध करत उद्धव ठाकरेंवर कुरघोडी केली आहे. त्यानंतर आता शिंदे गट अपात्रता टाळण्यासाठी तसेच आपला गट हीच खरी शिवसेना आहे, असं सांगत शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा ठोकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच त्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. तसेच तळागाळातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेतल्या जात आहेत.