उद्धव ठाकरेंचं मिशन ४०! एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांना शह देण्याची रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 07:52 PM2022-11-01T19:52:57+5:302022-11-01T19:53:22+5:30
केवळ मतदारसंघातच नव्हे तर स्थानिक बूथ पातळीवर हा आढावा घेतला जात आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत कमबॅक करायचा असा चंग ठाकरेंकडून बांधला जात आहे.
मुंबई - एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्यानं उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळलं, ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. त्यामुळे शिंदे यांच्यासह ४० आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. ठाकरे-शिंदे वादात सध्या शिवसेना नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे २ गट पक्षात पडले आहेत.
आता उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्या ४० आमदारांना मतदारसंघात पाडण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सत्तासंघर्षाचा निकाल लागेल तेव्हा लागेल परंतु निवडणुकीच्या मैदानात शिंदेंना शह देण्याचा डाव ठाकरेंकडून आखला जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा-विधानसभा निवडणुकीची ठाकरेंनी आत्तापासून तयारी सुरू केलीय. मातोश्रीवर रोज बैठका लावल्या जात आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेतला जात आहे.
यात मुख्यत: एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या मतदारसंघात नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मागील निवडणुकीतील आकडेवारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करत याठिकाणी पुढील निवडणुकीत कुणाला उभे करायचं याचा आढावा घेतला जात आहे. इतकेच नाही तर त्या मतदारसंघातील कट्टर शिवसैनिकाला पुढे आणून बंडखोरांविरोधात उभे करण्याचंही ठाकरे विचार करत आहेत.
मातोश्रीवरच्या बैठकीत काय ठरलं?
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बंडखोरी झाली. त्यामुळे या विभागातील प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर सोपवली आहे. त्यातील ४० मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक आमदार आणि पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात धुसपूस होती का? कुठला पदाधिकारी आमदाराला टक्कर देऊ शकतो? त्याचसोबत इतर पक्षातील कोण नेता बंडखोराला आव्हान देण्यास सक्षम आहे याचा आढावा घेतला जात आहे.
केवळ मतदारसंघातच नव्हे तर स्थानिक बूथ पातळीवर हा आढावा घेतला जात आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत कमबॅक करायचा असा चंग ठाकरेंकडून बांधला जात आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री काळात केलेली कामे, विरोधकांच्या धोरणांमुळे राज्यातील प्रकल्प इतर राज्यात गेल्याचा मुद्दा असे अनेक विषय आगामी काळात पुढे आणले जाणार आहेत. मात्र येत्या निवडणुकीत भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याचं चित्र असल्याने उद्धव ठाकरेंसाठी हे आव्हानात्मक आहे. मात्र ४० बंडखोर आमदारांच्या मतदारसंघ जास्तीत जास्त जागा मिळवायच्यात असं ठाकरेंकडून प्लॅन आखण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"