उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी; टाटांच्या एयरबस प्रकल्पावरून भाजपाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 03:15 PM2022-10-28T15:15:47+5:302022-10-28T15:16:41+5:30
टाटा समूहासोबत सामूहिक भागीदारी करून एयरबसने २०२० मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु केली
मुंबई - वेदांतानंतर राज्यातील आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी युती सरकारला कोंडीत पकडले आहे. उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र त्यावर आता भाजपानेही प्रत्युत्तर देत टाटांचा एयरबस प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
याबाबत भाजपा महाराष्ट्रने म्हटलंय की, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष स्वत:ला घरात कोंडून घेतल्यानेच एयरबस प्रकल्प गुजरातला गेला. भारताने १२६ C-295 Medium Combat Aircraft साठी विविध निविदा मागवल्या होत्या. त्यात एयरबसची निवड करण्यात आली. मोदींनी २०१५ साली एयरबसच्या फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी या विमानांचा स्पेनमधून पुरवठा करण्याचा प्रस्ताव एयरबसने ठेवला. २०१७ मध्ये मेक इन इंडिया अंतर्गत यातील काही विमाने भारतात बनवायची मागणी भारत सरकारने केली.
जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी केला आहे का?
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 28, 2022
कोणताही उद्योग राज्यात स्वतः हुन येत नाही, उद्योग धंद्याना वातावरण पोषक हवं. खंडणी उकळून, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवून, राज्यातील उद्योग धंदे बंद उद्धव ठाकरेनी करायला लावले. त्याला साथ राज्याचे
७
त्यानंतर टाटा समूहासोबत सामूहिक भागीदारी करून एयरबसने २०२० मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु केली. यावेळी महाराष्ट्र सरकारने कोणताही प्रस्ताव दिल्याची नोंद नाही. सप्टेंबर २०२१ मध्ये बंगळूरू, हैद्राबाद, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील प्रस्ताव तपासून ढोलेरा येथे प्रकल्प टाकायचा प्राथमिक निर्णय घेतला. या काळात महाराष्ट्र सरकारने कोणतीही प्रस्ताव व या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची नोंद सरकार दरबारी कुठेही आढळून आलेली नाही. फेब्रुवारी २०२२ ला पुन्हा एकदा प्रकल्पाचा पुन्हा विश्लेषण करण्यात आले. यावेळी सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून कोणीही एयरबसच्या अधिकाऱ्यांना भेटल्याची नोंद नाही असं भाजपानं म्हटलं आहे.
त्याचसोबत सप्टेंबर २०२२ मध्ये एयरबसच्या प्रकल्पासाठी (6 प्रस्तावित प्रकल्प आहेत) महाराष्ट्र सरकार उत्सुक असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना बोलल्याची नोंद आहे. एयरबसशी चर्चा न करता प्रकल्प महाराष्ट्रात कसा येऊ शकतो? यावर महाविकास आघाडीने मार्गदर्शन करावे. तब्बल अडीच वर्षात एकही प्रकल्प महाराष्ट्रात का आले नाहीत? याचा अभ्यास जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी केला आहे का? असा सवाल भाजपाने उपस्थित केला.
दरम्यान, कोणताही उद्योग राज्यात स्वतः हून येत नाही, उद्योग धंद्याना वातावरण पोषक हवं. खंडणी उकळून, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवून, राज्यातील उद्योग धंदे बंद उद्धव ठाकरेनी करायला लावले. त्याला साथ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ४ महिन्यात कोणत्याही प्रकल्पाची पायाभरणी होत नाही. यासाठी वर्षे दोन वर्षे प्लॅनिंग, बिडिंग असतो. हे मविआच्या 'त्या' दोन - तीन पत्रकारांना कळू नये? असा टोला भाजपानं लगावला आहे.