उद्धव ठाकरे हाजिर हो!
By admin | Published: August 27, 2016 05:19 AM2016-08-27T05:19:42+5:302016-08-27T05:19:42+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यापैकी एकाने हजर राहावे, असे म्हणत उच्च न्यायालयाने त्यांना समन्स बजावले.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राच्या दाव्यात साक्षीदार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यापैकी एकाने हजर राहावे, असे म्हणत उच्च न्यायालयाने त्यांना समन्स बजावले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १३ डिसेंबर २०११ रोजी केलेल्या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या इच्छापत्रात बाळासाहेबांनी त्यांची बहुतांशी संपत्ती उद्धव ठाकरे यांच्या नावे केली आहे. तर त्यांचा नातू ऐश्वर्य याच्या नावावर मातोश्रीचा पहिला मजला केला आहे. बाळासाहेबांनी या इच्छापत्रात जयदेव यांच्या नावाचा साधा उल्लेखही न केल्याने जयदेव यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.
बाळासाहेबांचे मानसिक संतुलन ढासळल्याचा फायदा घेत उद्धव यांनी सर्व संपत्ती त्यांच्या नावावर केल्याचा आरोप जयदेव यांनी दाव्यात केला आहे.
या दाव्याच्या सुनावणीत आतापर्यंत उच्च न्यायालयाने जयदेव ठाकरे, बाळासाहेबांचे फिजिशियन डॉ. जलील परकार, सेनेचे नेते अनिल परब आणि इच्छापत्र तयार करणारे अॅड. एफ. डिसोझा यांची साक्ष नोंदवली आहे.
शुक्रवारच्या सुनावणीत जयदेव यांच्या वकील सीमा सरनाईक यांनी बाळासाहेब व जयदेव यांच्या संबंंधांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी सामनाचे संपादक आणि पत्रकार त्याचबरोबर अन्य काही वर्तमानपत्रांचे संपादक आणि पत्रकार यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावण्याची विनंती न्या. गौतम पटेल यांना केली.
मात्र उच्च न्यायालयाने सामना वगळता अन्य वृत्तपत्रांच्या संपादकांना व पत्रकारांना साक्षीदार म्हणून बोलवण्यास नकार दिला. ‘पत्रकारांना किंवा संपादकांना कोणी तरी माहिती देतो आणि त्या आधारावर ते माहिती प्रसिद्ध करतात. हे सर्व ऐकीव असते, बाळासाहेब आणि जयदेव यांच्या नातेसंबंधातील माहिती त्यांना वैयक्तिकरीत्या आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे अशा लोकांची साक्ष नोंदवणे दाव्याच्या दृष्टीने धोकादायक आहे,’ असे म्हणत न्या. पटेल यांनी अन्य वर्तमानपत्रांचे संपादक आणि पत्रकारांची साक्ष नोंदवण्याची जयदेव ठाकरे यांची विनंती फेटाळली.
मात्र उच्च न्यायालयाने ‘सामना’चे संपादक म्हणजेच उद्धव ठाकरे किंवा कार्यकारी संपादक संजय राऊत किंवा ज्याने बाळासाहेब व जयदेव यांच्या संबंधांवर लेख लिहिला
होता त्या पत्रकाराने साक्षीदार म्हणून हजर राहावे, असे म्हणत समन्स बजावले. या दाव्यावरील पुढील सुनावणी १० आॅक्टोबर रोजी
ठेवण्यात आली आहे. जयदेव यांच्या साक्षीनंतर त्यांच्या तिसऱ्या पत्नी अनुराधा ठाकरे यांचीही साक्ष नोंदवण्यात येईल. (प्रतिनिधी)
>पत्रकार-संपादकांची साक्ष नोंदण्यास नकार
पत्रकारांना किंवा संपादकांना कोणी तरी माहिती देतो आणि त्या आधारावर ते माहिती प्रसिद्ध करतात. हे सर्व ऐकीव असते, बाळासाहेब आणि जयदेव यांच्या नातेसंबंधातील माहिती त्यांना वैयक्तिकरीत्या आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे अशा लोकांची साक्ष नोंदवणे दाव्याच्या दृष्टीने धोकादायक आहे,’ असे म्हणत न्या. पटेल यांनी अन्य वर्तमानपत्रांचे संपादक आणि पत्रकारांची साक्ष नोंदवण्याची जयदेव ठाकरे यांची विनंती फेटाळली.