उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद देऊन राज यांना नेतृत्व द्यावं; मनसे नेत्याचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 10:07 AM2023-08-08T10:07:18+5:302023-08-08T10:08:09+5:30
हा भाजपाचा दुटप्पीपणा आहे. भाजपाचा दुटप्पीपणा आम्ही उघडा करू असंही मनसे नेत्यांनी सांगितले.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहून जनता अस्वस्थ आहे. जनतेला हे आवडले नाही. या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये आहे. उद्धव ठाकरेंनी हे समजून घेतले पाहिजे. राज ठाकरेंना आशीर्वाद देऊन त्यांच्याकडे नेतृत्व दिले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे हे विधान मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केले आहे.
प्रकाश महाजन म्हणाले की, राज ठाकरेंसारखा लोकप्रिय कार्यक्षम नेता मिळणे अवघड आहे. मला भाजपाचे नवल वाटते. राज ठाकरेंसोबत वैयक्तिक संबंध मैत्रीपूर्ण ठेवता मात्र पण राजकीय सोयीसाठी आघाडीसाठी भ्रष्टवादी राष्ट्रवादी काँग्रेस चालतो. त्यातल्या कित्येक लोकांचे हिंदुविषयी मते काय आहेत हे पाहा. पण राज ठाकरे चालत नाही. हा भाजपाचा दुटप्पीपणा आहे. भाजपाचा दुटप्पीपणा आम्ही उघडा करू असं त्यांनी सांगितले.
तसेच राजकीय कार्यक्षेत्र फार मोठे आहे. राज ठाकरे किती कडक आहेत सगळ्यांना माहिती आहे. क्षमता असलेल्या माणसाला त्याच्या क्षमतेप्रमाणे काम देण्याची खरं नेतृत्व राज ठाकरेंकडे आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची महाराष्ट्राची गरज आहे. त्यामुळे कुणाच्या मध्यस्थीशिवाय या दोघांनी एकत्र यावे असंही मत ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी मांडलं आहे.
...तर मी बोलायला तयार
मध्यंतरी उद्धव ठाकरे हे विधानभवनात आले होते. तेव्हा त्यांनी काही पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली होती. दोन भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली होती. या आधीदेखील त्यांनी दोघे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना नेहमीच पूर्णविराम दिला आहे. तसेच, पत्रकारांपैकीच कोणी पुढाकार घेणार असेल तर आपण या ध्वनिफिती मागण्यासाठी राजशी लगेच बोलायला तयार आहोत, असेही म्हटले होते. मात्र, राज यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा आपण करणार नाही हेही स्पष्ट केले होते.
उद्धव ठाकरे हे दादर येथे उभारल्या जात असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. बाळासाहेबांची शिवाजी पार्कवर दसऱ्याला जी भाषणे झाली त्यातील काही भाषणांच्या ध्वनिफिती उद्धव यांच्याकडे उपलब्ध नाहीत. उद्धव ठाकरे यांना अशी माहिती आहे की, ज्या ध्वनिफिती त्यांच्याकडे नाहीत त्यांपैकी बहुतेक सर्व या राज ठाकरे यांच्याकडे असू शकतात. कारण, राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी त्याकाळी बाळासाहेबांची भाषणे ध्वनिमुद्रित केलेली होती. आता राज यांच्याकडील या ध्वनिफिती मिळवायच्या तर त्यांच्याशी उद्धव यांना चर्चा करावी लागणार आहे. त्यावेळी दोघांमध्ये एकत्र येण्यासंदर्भाही चर्चा होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.