उद्धव ठाकरे यांनी सरकारचा पाठिंबा काढू नये - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 08:08 PM2017-09-29T20:08:59+5:302017-09-29T20:09:40+5:30
भाजपा व शिवसेनेने विधानसभेची निवडणूक वेगवेगळी लढविली. निवडणुकीनंतर दोघांनीही एकत्र येण्याची भूमिका घेतली. आता दोघांनीही सत्ता टिकविण्यासाठी आपसात जुळवून घेणे आवश्यक आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचा पाठिंबा काढू नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
नागपूर - भाजपा व शिवसेनेने विधानसभेची निवडणूक वेगवेगळी लढविली. निवडणुकीनंतर दोघांनीही एकत्र येण्याची भूमिका घेतली. आता दोघांनीही सत्ता टिकविण्यासाठी आपसात जुळवून घेणे आवश्यक आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचा पाठिंबा काढू नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. मात्र, तसे झाले तर दुस-याच दिवशी आपण शरद पवार यांची भेट घेऊ. त्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत, असे सूचक संकेतही त्यांनी दिले.
पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजपाला सत्तेसाठी १५ आमदार कमी पडतात. अविश्वासाचा ठराव आल्यावर भाजपाला कुणीही पाठिंबा देऊ शकते. शिवसेनेचे आमदारही येऊ शकतात. विरोधी गोटातील काही आमदार अनुपस्थित राहू शकतात. नरसिंहराव यांचे सरकार असेच टिकले होते. त्यामुळे सरकार पडणारच नसेल तर शिवसेनेने पाठिंबा काढू नये, असा सल्ला त्यांनी दिला. सरकार पडले व निवडणुकीला जाण्याची वेळ आली तर त्यासाठीही रिपाइं भाजपासोबत सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रिपाइं (आ.) चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते.
आठवले काय म्हणाले...
- माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा हे काँग्रेसमध्ये असल्यासारखे बोलत आहेत. कदाचित मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असावेत. केंद्र सरकार चांगले काम करीत आहे. अधिक वेळ द्यायला हवा.
- नारायण राणे यांनी भाजपामध्ये जावे. तिकडे जमणार नसेल तर आम्ही त्यांना रिपाइंमध्ये घेण्यास तयार आहोत.
- नाराज असलेले भाजपाचे खासदार नाना पटोले यांना काय हवे आहे माहीत नाही. मात्र, पटोलेंना शांत कसे करायचे हे भाजपाला माहीत आहे.
- एल्फिस्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी.
भाजपाने वेगळ्या विदर्भाची घोषणा करावी
भाजपाने वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. आता केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भाजपाने वर्षभरात विदर्भ राज्याची घोषणा करावी. या मागणीसाठी रिपाइंतर्फे १० नोव्हेंबर रोजी नागपूर येथे ह्यस्वतंत्र विदर्भ राज्य मागणी परिषदह्ण आयोजित केली जाईल. तीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व पक्षीय विदर्भ समर्थक नेत्यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.