Chandrashekhar Bawankule: "उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढावी अन्...", चंद्रशेखर बावनकुळेंचा सणसणीत टोला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 11:35 AM2022-12-05T11:35:22+5:302022-12-05T11:36:23+5:30
उद्धव ठाकरेंनी स्वत:चा पक्ष संपवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या सर्व त्यांनी केल्या आहेत.
उद्धव ठाकरेंनी स्वत:चा पक्ष संपवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या सर्व त्यांनी केल्या आहेत. आता त्यांनी एक काम करावं निवडणूक आयोगात जावं आणि काँग्रेस पक्षाच्या घटनेची झेरॉक्स कॉपी काढावी. तिच आपल्या पक्षाची घटना करुन टाकावी एवढंच बाकी राहिलं आहे, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक होणार आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर असं नवं समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी या युतीवर टीका केली. "मागासवर्गीय समाज ही काही कुणाही जहागीर नाही. जो जनतेसाठी काम करतो जनता त्याच्या मागे असते. इथं जात वगैरे पाहिली जात नाही. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार लोकांचं काम करत आहे. त्यामुळे कोणतीही युती-आघाडी झाली तरी शिंदे-फडणवीस युतीला तोड नाही", असं बावनकुळे म्हणाले.
सीमा प्रश्नावर नरमाईची भूमिका नाही
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर शिंदे-फडणवीस सरकारनं नरमाईची भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप बावनकुळे यांनी फेटाळून लावला. "सीमावादावर कोणतीही नरमाईची भूमिका नाही. गेल्या ६५ वर्षात सीमाभागात विकास झालेला नाही. त्यामुळे तिथल्या लोकांना वाटतं की जे सरकार चांगल्या सुविधा देतं ते आपलं. शिंदे-फडणवीस सरकारनं याच मुद्द्यावर लक्ष केंद्रीय तरुन सीमाभागात सुविधांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे", असं बावनकुळे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"